श्रीपूर मध्ये प्रशांत क्रीडा महोत्सवाचा जल्लोष | आयपीएस प्रशांत डगळे यांच्या हस्ते उद ्घाटन
श्रीपूरातआठव्या प्रशांत क्रीडा महोत्सवाचे रंगारंग उद्घाटन

प्रशांत क्रीडा महोत्सवाचे श्रीपूरात उत्साहात उद्घाटन
श्रीपूर (प्रतिनिधी) : तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कामगार मंडळामार्फत आठव्या प्रशांत क्रीडा महोत्सवाचे श्रीपूर येथे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात क्रीडा ध्वज, रंगीबेरंगी फुगे आकाशात झेपावले आणि क्रिकेट सामन्याच्या टॉसने स्पर्धांची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंढरपूर तालुक्याचे आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे होते. त्यांच्यासह ज्येष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे, प्रणव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख, धनाजी वाघमोडे, अक्षय वाडकर, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भास्कर कसगावडे, विजय जाधव, शामराव साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सर्व पाहुण्यांचा कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, “प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली कारखाना सातत्याने प्रगती करत आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती जपण्यासाठी क्रीडा महोत्सव हा उत्तम उपक्रम ठरला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की प्रशांत डगळे यांनी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास करून सर्वसामान्य कुटुंबातून उंच भरारी घेतली आहे, हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी बोलताना प्रणव परिचारक यांनी सांगितले की, “कै. सुधाकरपंत परिचारक यांनी आयुष्यभर कामगार व सभासद यांच्यातील खेळाडूवृत्ती जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आशीर्वादानेच आज कारखाना उत्तम प्रकारे पुढे जात आहे.”
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, आट्यापाट्या, दोर ओढणे यांसह विविध स्पर्धा होणार आहेत. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रशांत डगळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर पोफळे यांनी केले.