सामाजिक बांधिलकीची नवी दिशा : किरण ज्योती लिनेस क्लबचे नव्या कार्यकारिणीचे गठन
गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प; अकलूज किरण ज्योती लिनेस क्लबची नवी टीम कार्यरत

अकलूजमध्ये किरण ज्योती लिनेस क्लबचा दिमाखदार शपथविधी सोहळा संपन्न
अकलूज (केदार लोहकरे):
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लिनेस क्लब या संघटनेअंतर्गत अकलूज येथे कार्यरत असलेल्या किरण ज्योती लिनेस क्लबच्या नव्या संचालक मंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महावीर पथ येथील अग्रवाल हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
दुसऱ्या वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीत कॅबिनेट ऑफिसर म्हणून सुप्रिया मुदगल, अध्यक्षा सौ. अंजली कुलकर्णी, सेक्रेटरी मंजिरी जोशी, खजिनदार मोनाली देशपांडे यांची निवड करण्यात आली. तसेच श्रद्धा जोशी, वीणा कुलकर्णी, प्राप्ती कुलकर्णी आणि वैशाली कुलकर्णी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी पास्ट डिस्ट्रिक्ट ऑफिसर लिनेस छाया बुराडे मॅडम यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रिजनल कॉर्डिनेटर लिनेस राजश्री जगताप उपस्थित होत्या. आनंदी लिनेस क्लबच्या सेक्रेटरी रश्मी ढोक व सदस्य संगीता दोशी यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत, गणेश वंदना, प्रार्थना व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. शपथविधीनंतर क्लबच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून आपल्या मुलीला उच्च शिक्षण देणाऱ्या माय-लेकीचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एका गरजू महिलेच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.
कॅबिनेट ऑफिसर सुप्रिया मुदगल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लिनेस क्लबचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक उपक्रम राबविणे, गरजूंना मदतीचा हात देणे, अपंगांना सहाय्य करणे, पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करणे, अनाथाश्रम, बालकाश्रम व वृद्धाश्रमातील गरजूंना साहित्य पुरविणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविणे हा आहे. आगामी काळात अधिक व्यापक सामाजिक कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्षा सौ. अंजली कुलकर्णी व कॅबिनेट ऑफिसर सुप्रिया मुदगल यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्यामुळे शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अकलूजमध्ये किरण ज्योती लिनेस क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याची नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संपादक – दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज



