माळशिरस पंचायत समितीत खळबळ | पाच हजारांच्या लाचेवर वरिष्ठ सहाय्यक रंगेहात
लाच घेताना सुंदरराव नागटिळक पकडले; पुणे ACB ची पंचायत समितीत धडक कारवाई

पाच हजारांची लाच घेताना वरिष्ठ सहाय्यक ACB च्या जाळ्यात
माळशिरस :
माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक (वय ५६) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयात कामासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे सभा मंडपाचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे बिल सोलापूर कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. तेथून हे बिल पुढील कार्यवाहीसाठी माळशिरस पंचायत समितीकडे आले. काम पूर्ण झाल्याचा दाखला गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे तब्बल दहा हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते.
लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदार यांनी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारताना नागटिळक यांना अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
या प्रकरणात गटविकास अधिकारी यांचीही चौकशी करण्यात आली; मात्र प्राथमिक पडताळणीत त्यांच्याविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या नाहीत. आरोपीविरुद्ध सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, लेडीज पोलीस कॉन्स्टेबल माकर, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, कुमकर व चालक दिवेकर यांच्या पथकाने केली.



