महाराष्ट्र

ढोलकीच्या ठेक्यावर रंगणार अकलूजमध्ये दोन दिवस लावणीचा महासंग्राम Lavani Akluj 2026

लावणीचा बादशाही थाट अकलूजमध्ये; लाखो रुपयांच्या पारितोषिकांसह राज्यस्तरीय जल्लोष!

अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणीचा जल्लोष; २९ व्या वर्षी स्पर्धेला नवचैतन्य

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

अकलूज (केदार लोहकरे)

अकलूज नगरी पुन्हा एकदा लावणीच्या ठेक्यावर थिरकणार असून सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती, शंकरनगर अकलूज यांच्या वतीने दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी स्मृतीभवन, शंकरनगर येथे ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षानिमित्त जानेवारी १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला प्रारंभ केला होता. सन २०१८ पर्यंत अविरतपणे सुरू राहिलेल्या या स्पर्धेमुळे असंख्य लावणी कलाकारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळाले. अनेक कलावंतांना चित्रपट व रियालिटी शोमध्ये संधी मिळाली आणि अकलूजची लावणी देशासह परदेशातही पोहोचली.

समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी २०२४ पासून या स्पर्धेला नव्याने सुरुवात करत परंपरा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा २९ वे वर्ष साजरे होत असून स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर ही स्पर्धा रंगणार आहे.

यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील ११ निवडक लावणी पार्ट्यांना संधी देण्यात आली आहे. पारंपारिक तसेच नवकवींच्या लावण्यांचा नजराणा, ढोलकीची ठसकेबाज थाप, घुंगरांची साथ, पदन्यासाची नजाकत आणि पेटी-तबल्याची संगत यामुळे रसिकांना दर्जेदार कलास्वाद अनुभवता येणार आहे.

भव्य पारितोषिकांची घोषणा

स्पर्धेसाठी आकर्षक व भव्य पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

  • प्रथम क्रमांक – रुपये ३ लाख
  • द्वितीय क्रमांक – रुपये २ लाख
  • तृतीय क्रमांक – रुपये १ लाख
  • उत्कृष्ट नृत्यांगना – रुपये ५ हजार व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृती चषक
  • उत्कृष्ट अदा (वैयक्तिक) – रुपये ५ हजार
  • उत्कृष्ट मुजरा – रुपये ३ हजार
  • उत्कृष्ट ढोलकीपटू, पार्श्वगायिका, पेटीवादक व तबलावादक – प्रत्येकी रुपये १ हजार

सहभागी पार्ट्या

शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६
वैशाली समसापुरकर (जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी),
काजल-स्वाती जळगावकर (अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा जि. अहिल्यानगर),
बेला-श्रद्धा नेटूरकर (जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी पंढरीचापूल जि. अहिल्यानगर),
अपर्णा-कीर्ती नगरकर (लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी जि. पुणे),
गीता-श्रुती वाईकर (रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गोकुळ शिरगाव ता. कागल जि. कोल्हापूर).

रविवार, १ मार्च २०२६
छाया-पूजा-श्रद्धा कोल्हापूरकर (रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार जि. कोल्हापूर),
ज्योत्स्ना वाईकर (पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता. वाई जि. सातारा),
नटरंग सांस्कृतिक कला केंद्र (ग्रुप पार्टी, मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर),
राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र (ग्रुप पार्टी, यवत चौफुला जि. पुणे),
वैष्णवी कोल्हापूरकर (रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार जि. कोल्हापूर),
न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र (ग्रुप पार्टी, यवत चौफुला जि. पुणे).

स्पर्धेसाठी प्रवेशिका व अधिक माहितीसाठी ९७६४११३६९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अकलूज नगरीत दोन दिवस रंगणाऱ्या या लावणी महोत्सवामुळे सांस्कृतिक वातावरण भारावून जाणार असून रसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

संपादक : दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!