महाराष्ट्र

मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक प्रकार | एकाच दहावी परीक्षा केंद्रावर १ मुलगी व ९ मुले बोगस

केंद्र संचालकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली बनावट विद्यार्थ्यांची टोळी

सोलापूर प्रतिनिधी :
नंदेश्‍वर येथील बाळकृष्ण विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी तब्बल दहा विद्यार्थी बोगस आढळल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ले यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शुक्रवार पासून दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होता. सकाळी ११ वाजता प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांनी पर्यवेक्षकांनी हॉलतिकीट तपासणी सुरू केली. यावेळी एका विद्यार्थ्याकडे मूळ हॉल तिकीटा ऐवजी झेरॉक्स प्रत आढळली. संबंधित विद्यार्थी वयाने आणि शारीरिक बांध्याने मोठा दिसत असल्याने संशय निर्माण झाला.

ही बाब केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी तातडीने सर्व कक्षांमध्ये हॉलतिकीटांची सखोल पडताळणी सुरू केली. तपासणी दरम्यान प्रत्येक हॉलमध्ये एक विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आले. ऑनलाईन बोर्डाच्या संकेतस्थळावरून मूळ हॉलतिकीट तपासले असता त्यावरील फोटो आणि विद्यार्थ्यांकडे असलेल्या झेरॉक्सवरील फोटो वेगळे असल्याचे स्पष्ट झाले.

या केंद्रावर एकूण ५३ विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यापैकी ९ मुले आणि १ मुलगी असे एकूण १० जण बोगस असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित विद्यार्थी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूल येथील असल्याची माहिती केंद्र संचालकांनी दिली.

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. मंगळवेढा पोलिस स्टेशन येथील पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी अधिक तपास सुरू केला आहे.

मंगळवेढ्याच्या इतिहासात एकाच परीक्षा केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस विद्यार्थी आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस तपासानंतर नेमके मूळ विद्यार्थी कोण होते आणि त्यांनी परीक्षा का दिली नाही, याचा उलगडा होणार आहे. सध्या या घटनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!