महाराष्ट्र

श्रीपूर मध्ये शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन | शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज चौकात 24 फेब्रुवारीला शाहिरी शिवगर्जना कार्यक्रम

डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीपूरमध्ये शिवजयंती उत्सवाचा शुभारंभ

श्रीपूर मध्ये शिवजयंती निमित्त जिगरबाज ग्रुपकडून भव्य मोटारसायकल रॅली

श्रीपूर (ता. माळशिरस) – शिवजयंती 2026 निमित्त श्रीपूर, महाळुंग येथे राजे ग्रुप, महाळुंग-श्रीपूर, जिगरबाज ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्रपरिवार, महामानव प्रतिष्ठान, श्रीपूर, शहीद निवृत्ती नगर, आनंदनगर, कारखाना वसाहत व पंचक्रोशी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  जिगरबाज ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्रपरिवार यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्थानिक शिवभक्तांनी, ग्रामस्थांनी व विशेष सहभाग डॉ.यशवंत कुलकर्णी (कार्यकारी संचालक) यांनी नोंदविला.

उत्सवाची सुरुवात सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. डॉ.यशवंत कुलकर्णी (कार्यकारी संचालक) कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या शुभहस्ते पूजन पार पडले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर सर्व क्षेत्रातील, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीदरम्यान युवकांनी भगवे झेंडे, घोषवाक्ये आणि शिवगर्जना देत संपूर्ण परिसर शिवमय केला. गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात रॅली पार पडली.

याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शाहिरी शिवगर्जना व मराठमोळ्या लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शाहीर पृथ्वीराज माळी व सहकारी मित्रमंडळींचा सहभाग असणार आहे. अशी माहिती जिगरबाज ग्रुप संस्थापक राजरत्न नाईकनवरे यांच्याकडून देण्यात आली.

शिवचरित्र, शिवपराक्रम आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या शाहिरी कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिवजयंती निमित्त श्रीपूरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. आयोजकांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक ऐक्य आणि शिवविचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

तसेच महामानव प्रतिष्ठान, श्रीपूर यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त  “रायबा, हेच का आपले स्वराज्य” हे तडाखेबंद महानाट्य सोमवारी, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीपूर मध्ये होणार आहे अशी माहिती महामानव प्रतिष्ठान,श्रीपूर कडून देण्यात आली आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!