महाराष्ट्र

अकलुज पोलिसांकडून ११ मंडळे व डीजे चालकांवर गुन्हे दाखल | Akluj Police | DJ Dolby

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिसांची कडक कारवाई; १२५ डेसिबल पर्यंत आवाज!

अकलुज, दि. २१ फेब्रुवारी २०२६ :

शिवजयंती उत्सव २०२६ शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करूनही काही मंडळांनी नियमांना हरताळ फासल्याने अकलुज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिरवणुकीदरम्यान डीजे, डॉल्बी व लेझर शोचा वापर करून ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ११ शिवजयंती मंडळे व संबंधित डीजे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अपर पोलीस अधीक्षक यांनी शिवजयंतीपूर्वी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे सर्व मंडळांची बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मिरवणुकीत डीजे/डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करावा तसेच सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग व , पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे यांनीही स्थानिक मंडळे, डीजे धारक व नागरिकांची बैठक घेऊन कायद्याचे पालन करण्याबाबत सक्त ताकीद दिली होती. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६८ अन्वये नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या.

मात्र दिनांक २० फेब्रुवारी रोजी अकलुज शहरातील विविध मंडळांनी मोठ्या आवाजात डीजे, डॉल्बी व लेझर शोचा वापर करून सार्वजनिक शांतता भंग केली. काही ठिकाणी आवाजाची पातळी तब्बल १२५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांच्या मोजणीत आढळून आले. हे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २(५), ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चे कलम ३, ४, ८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

📊 ध्वनीप्रदूषणाची नोंद (डेसिबलमध्ये)

हिंदवी प्रतिष्ठान – १०८

लहुजी साम्राज्य प्रतिष्ठान – ११५

सह्याद्री प्रतिष्ठान – १०५

छावा ग्रुप – १०५

स्वराज्य प्रतिष्ठान (यशवंतनगर) – ११२

शिवदत्त प्रतिष्ठान – ११०

नवक्रांती प्रतिष्ठान – ११७

रामरहीम प्रतिष्ठान – ११८

संभाजीराजे प्रतिष्ठान – १२५

शिवमुद्रा प्रतिष्ठान – ११०

महाराज प्रतिष्ठान – १०७

डीवायएसपी संतोष वाळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. उत्सव साजरा करा, पण नियम पाळूनच करा,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

🚨 कडक संदेश

शिवजयंती हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा उत्सव आहे. मात्र काही मंडळांच्या बेजबाबदार वर्तनामुळे सामान्य नागरिक, रुग्ण, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने घेतलेली ही कारवाई भविष्यासाठी धडा ठरणार आहे.

अकलुज पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे आगामी काळात कोणतेही मंडळ किंवा कार्यक्रम आयोजक डीजे-डॉल्बी लावताना दहावेळा विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!