
शेजारच्या शेतकऱ्याचा हलगर्जीपणा नडला
श्रीपूर तालुका माळशिरस येथील दिलीप लक्ष्मण माने या शेतकऱ्याच्या ऊसाला, ऊसतोड चालू असताना शनिवारी सकाळी दहा चे सुमारास अचानक आग लागल्याचे दिसून आले. सदर ऊसाच्या प्लॉटला पाच बैलगाड्या लावून सकाळी ऊसतोड सुरू असताना हा प्रकार घडला आहे. हाता तोंडाला आलेले ऊसाचे पिक समोर जळून खाक होताना दिसत होते. साडेचार एकर सुरू नवीन लागण असलेला ऊस कारखान्याला तोडून जात असताना पेटल्यामुळे, हातात तोंडाला आलेला घास निघून गेला आहे.
यामध्ये या शेतकऱ्याचे जवळपास ऊसाचे साडेसात लाख रुपये व जैन कंपनीचे ड्रिप एक लाख चाळीस हजार रुपये असे जवळपास नऊ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
शेजारच्या शेतकऱ्याने मक्याच्या कणसाचे बुरकुंडे पेटवले होते व लक्ष न दिल्यामुळे, वारे सुटल्यामुळे, बाजूचे वाळलेले गवत पेटून अचानक ती आग सदर ऊसाला लागल्या मुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.अशी माहिती दिलीप माने (पीडित शेतकरी) यांनी दिली आहे.
ऊस पेटल्याचे समजतात शेतकऱ्याने श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसलरी व सहकार महर्षी साखर कारखाना यांच्या अग्निशामक यंत्रणेला फोन करून बोलावून घेतले. तिन्ही कारखान्याचे अग्निशामकाने जळत असलेला ऊस वीजवण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळपास सर्व ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे.