“जाऊद्या, काय नसतं” या एका वाक्यामुळे अनेक विद्यार्थी गुन्ह्यांमध्ये अडकतात-समाधान देशमुख, ASI Akluj PS
‘तुम्हीच देशाचे भविष्य’ – निर्भया पथकाचे श्रीपूरमधील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणारे निर्भया पथकाचे अनमोल मार्गदर्शन
(संपादक-दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज)
श्रीपूर (ता. माळशिरस): येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय येथे अकलूज पोलीस प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षाविषयक व व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अकलूज पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस.आय.) समाधान देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अत्यंत वास्तवाशी निगडित, प्रेरणादायी व उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवादातून करण्यात आली. “तुम्हीच देशाचे भविष्य आहात, तुमच्या हातात उद्याचा भारत आहे,” असे सांगत देशमुख यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे स्वतःला कमी लेखण्याचे कोणतेही कारण नाही. आज देशातील विविध पदांवर कार्यरत असलेली अनेक व्यक्तिमत्त्वेही अशाच ग्रामीण भागातून पुढे आली आहेत, हे उदाहरणांसह त्यांनी स्पष्ट केले.
अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव आवश्यक
१८ वर्षांनंतर मिळणाऱ्या मतदानाचा अधिकार, वाहन चालविण्याचा परवाना, व्यवहाराचे हक्क यांसोबतच कर्तव्यांची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे नमूद करत त्यांनी चांगला नागरिक घडण्यासाठी चार महत्त्वाचे घटक स्पष्ट केले –आई-वडील, शिक्षक, मित्र आणि स्वतःचे वर्तन.
आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवणे, शिक्षकांचा सन्मान राखणे ही आपली संस्कृती आहे. त्याचबरोबर मित्रांची निवड अत्यंत महत्त्वाची असून “जाऊद्या, काय नसतं” या एका वाक्यामुळे अनेक विद्यार्थी गुन्ह्यांमध्ये अडकतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.
वाईट संगत, व्यसन आणि गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा इशारा
आज पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमागे वाईट संगत, व्यसन आणि मोबाईलचा गैरवापर कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चोरी, मारामारी, मुलींची छेडछाड, सायबर गुन्हे यामध्ये अनेक तरुण विनाकारण अडकतात. “चूकच करणार नाही, असा ठाम निर्णय घेतला तर कायद्याची भीती बाळगण्याची गरजच उरत नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
मोबाईल आणि सोशल मीडियाचा मर्यादित व सकारात्मक वापर करा
मोबाईल हे संवाद, माहिती व मनोरंजनाचे साधन असले तरी त्याचा गैरवापर धोकादायक ठरतो. ओटीपी फसवणूक, चुकीचे मेसेज, सोशल मीडियावरील वाद यामुळे सायबर गुन्हे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अभ्यास, माहिती आणि सकारात्मक गोष्टींसाठीच करावा, असे आवाहन करण्यात आले.
देशप्रेम, इतिहास आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांची प्रेरणा
देशमुख यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ए.पी.जे. अब्दुल कलाम, विक्रम बत्रा यांसारख्या महापुरुषांच्या त्यागाची आठवण करून दिली.
“हा देश सहज मिळालेला नाही. लाखो लोकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे,” असे सांगत त्यांनी देशाबद्दल आत्मीयता निर्माण केली.
छंद जोपासा, ज्ञान वाढवा आणि आत्मविश्वास ठेवा
शालेय शिक्षणासोबत वाचन, सामान्य ज्ञान, खेळ, कला, ट्रेकिंग, योगा यांसारखे छंद जोपासल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण होते, असे त्यांनी सांगितले. फक्त गुणांसाठी नव्हे तर माणूस म्हणून चांगला घडण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, असा संदेश दिला.
दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
कार्यक्रमाच्या शेवटी येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस व निर्भया पथक अकलूज यांच्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. “तुमच्या हातून समाजासाठी, देशासाठी काहीतरी चांगले घडो, हाच आमचा उद्देश आहे,” असे सांगत मार्गदर्शनाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला प्राचार्य पांडुरंग बनसोडे सर, पत्रकार दत्ता नाईकनवरे, पर्यवेक्षक सिताराम गुरव सर, सुहास शेंडे सर, मोहन लाळे सर, तानाजी बिचकुले सर, प्रमोदिनी बिचकुले मॅडम, अंजली गवळी मॅडम गणेश सावंत, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.



