अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पांडुरंग कारखान्याकडून ऊस वाहतूक कराराचा शुभारंभ
यावर्षी ऊस वाहतूक वाहने वाढविणार, एक्सपान्शनचे काम प्रगतीपथावर सुरू

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या 2023-24 गळीत हंगामासाठीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. अक्षय तृतीयेच्या खास मुहूर्तावरती ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे आज ऍग्रीमेंट करून करार करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ श्री पांडुरंग आणि श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून, वाहतूक करार करण्यात आले. यावेळी जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे. व्हा.चेअरमन कैलास खुळे सर, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी. कुमठेकर, ऊस विकास अधिकारी एस. पी. भालेकर, ओ.एस. भीमराव बाबर, कारखान्याचे सर्व अधिकारी आणि वाहतूक करार करण्यासाठी आलेले वाहतूकदार उपस्थित होते. आज प्राथमिक स्वरूपात 15 करार करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले, “रिकव्हरी च्या बाबतीत जिल्ह्यामध्ये आपला कारखाना सर्वात पुढे आहे. एक्सपान्शनचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. कारखाना भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांच्या ऊसाला तोडण्यासाठी व गाळपासाठी उशीर होणार नाही. ऊस वाहतूकदारांचे आणखी ज्यादा करार आम्ही यावर्षी करून घेणार आहोत. त्यांना ऍडव्हान्स देखील ताबडतोब देणार आहोत.”
ऊस वाहतूक करार करण्यासाठी आलेल्या वाहतूकदारांनी कारखान्याचे नियोजन, आणि भविष्यातील योजना, नवीन प्रकल्प ऐकून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार केन मॅनेजर कुमठेकर यांनी मानले.