आठ दिवसात तीन ठिकाणी महाळुंग-श्रीपूर मध्ये घर फोड्या
चोरांचा सुळसुळाट | परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय
परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय, चोरांचा सुळसुळाट | श्रीपूर आऊट पोस्टला कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी कार्यरत ठेवण्याची मागणी.
श्रीपूर तालुका माळशिरस येथे गेल्या आठ दिवसांमध्ये महाळुंग आणि श्रीपूर मधील काही ठिकाणी रात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून, घरांची दारे, कडी, कोयंडे तोडून, शेजाऱ्यांच्या दाराला बाहेरून कड्या लावून, आत प्रवेश केल्यानंतर इतर खोल्यांना बाहेरून कडी लावून, रोख रक्कम, दागिने, वस्तू चोरून नेहल्याच्या घटना घडल्या आहेत. आठ दिवसात तीन ते चार ठिकाणी ह्या चोऱ्या झाल्या आहेत. तसेच मागील काही दिवसापूर्वी ब्रह्मचैतन्यनगर मध्ये दिवसा घराचे दारचे कडी, कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. नागरिकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला होता.
अशा अनेक घटनांमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांमधून श्रीपूर आऊट पोस्ट पोलीस स्टेशनला दिवस आणि रात्री पोलीस कर्मचाऱ्यांनी 24 तास कार्यरत राहण्यासंदर्भात मागणी होत आहे. तसेच परिसरात रात्री बंदोबस्त व पेट्रोलिंग वाढवण्या संदर्भात मागणी केली जात आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करणे गरजेचे आहे. नुकतेच आठ दिवसापूर्वी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक गावामध्ये झाले होते. ते आणखी प्रभावी करून, अशा प्रकारच्या चोऱ्या थांबवण्यासाठी, चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी, पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.



