महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषदेत महिला बचत गटाच्या अध्यक्षांचा विजय; दोन महिला नगरसेविका प्रथमच सभागृहात

अकलूज नगरपरिषदेत महिला बचत गटाच्या दोन अध्यक्षांची दमदार एन्ट्री

महिला सशक्तीकरणाचा विजयघोष: अकलूज नगरपरिषदेत दोन महिला बचत गट अध्यक्षांची दमदार एन्ट्री

अकलूज (संजय लोहकरे) – अकलूज नगरपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत महिला बचत गटाच्या नेतृत्वाने इतिहास घडवला आहे. अकलूज व यशवंतनगर येथील महिला बचत गटांच्या दोन अध्यक्षांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत नगरपरिषदेतील पहिल्या महिला नगरसेविका म्हणून मान मिळवला आहे. यामुळे संपूर्ण बचत गट चळवळीत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकलूज येथील लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा विलासानंद गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक ९ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे निवडणूक लढवली. तर यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. जयश्री संजय एकतपुरे यांनी प्रभाग क्रमांक १३ ब मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. दोन्ही महिला उमेदवारांनी सहज विजय संपादन करत नगरपरिषदेच्या सभागृहात आपले स्थान पक्के केले.

लोकसंचलित साधन केंद्रांमार्फत चालणाऱ्या महिला बचत गटांमध्ये साधारण ४५० ते ५०० बचत गट कार्यरत असून, त्यातून सुमारे पाच हजार महिला सभासद जोडल्या गेलेल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून कमी व्याजदरात मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जामुळे या महिलांनी विविध उद्योग-व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधले आहे. या सशक्तीकरणाचा सकारात्मक परिणाम अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत दिसून आला असून, महिला नेतृत्वाला जनतेकडून विश्वासाची पावती मिळाली आहे.

या विजयामुळे महिला बचत गट चळवळीचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग व नेतृत्व अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!