अकलूजमध्ये विजयाच्या जल्लोषात फटाक्याने घेतले उग्र वळण; दोन व्यवसायिकांचे संसार जळाले
मतमोजणीच्या दिवशीच दुर्घटना; अकलूजमध्ये भंगार व गॅरेजला आग

अकलूज येथे फटाक्याच्या ठिणगीमुळे भीषण आग; दोन व्यवसायिकांचे सुमारे २० लाखांचे नुकसान
अकलूज, दि. २१ (प्रतिनिधी) – अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शहरात विजयी जल्लोषाचा उत्साह असतानाच माळेवाडी–माळीनगर रोड (बाह्यवळण) परिसरात भीषण आगीची घटना घडली. भंगारचे दुकान तसेच चारचाकी वाहनांच्या बॉडी व रंगकाम करणाऱ्या मिस्त्रीचे दुकान आगीत जळून खाक झाले. या आगीत दोन व्यवसायिकांचे मिळून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रविवारचा दिवस आणि निवडणुकीची मतमोजणी सुरू असल्याने दोन्ही दुकाने बंद होती. मात्र विजय महादेव आडगळे यांच्या भंगारच्या दुकानाजवळ विजयी मिरवणुकीदरम्यान फटाक्याच्या आतषबाजीतील एक पेटलेला फटाका येऊन पडल्याने अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण भंगार दुकान जळून खाक झाले. या घटनेत आडगळे यांच्या दुकानाचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीचा लोट मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी असलेल्या इम्तियाज बाबासो शेख यांच्या चारचाकी गाड्यांच्या बॉडीचे साहित्य, रंगकामासाठी वापरणाऱ्या मशिन्स व दुकानातील साहित्य जळून राख झाले. या आगीत शेख यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे दोन्ही व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
घटनेची माहिती मिळताच अकलूज नगरपरिषदेचे अग्निशमन दल तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते–पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तात्काळ व प्रभावी प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली असून मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत दोन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



