महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन मागणीला व संपाला पाठिंबा
काळ्याफिती लावून केली जुन्या पेन्शनची मागणी

काळ्याफिती लावून केली जुन्या पेन्शनची मागणी
महाळुंग-श्रीपूर : सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सामील झाले आहेत. या संपाला पाठिंबा देण्यासाठी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सदर संपाला पाठिंबा देऊन जुन्या पेन्शनची मागणी केली आहे. या मागण्यांचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. काळ्याफिती लावून जुन्या पेन्शनची मागणी केली. या दिलेल्या निवेदनात सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची अंशदायी पेन्शन योजना रद्द करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचा विनाअट नगरपंचायतीमध्ये समावेश करावा, सफाई कर्मचारी यांचा आकृतिबंध निर्माण करण्यात यावा, सफाई कर्मचारी यांच्या आकृतिबंध मंजूर होईपर्यंत एखादा कर्मचारी मृत झाल्यास त्यांच्या वारसांना सफाई कर्मचारी अथवा वर्ग तीन किंवा चारचे पद रिक्त असल्यास त्या पदावर नियुक्ती द्यावी. यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण, जनरल सेक्रेटरी विलास ओव्हाळ यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.