डॉ.यशवंत कुलकर्णी यांची साखर आयुक्तांच्या सौर ऊर्जा समितीवर निवड
सहकार व पर्यावरणपूरक विकासाचा संगम; डॉ.यशवंत कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण निवड

पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांची साखर आयुक्तांच्या अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्प समितीवर निवड
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची साखर आयुक्त कार्यालयाच्या अपारंपारिक (सौर) ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण समितीवर निवड झाली आहे. ही निवड सहकार आणि ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रभावी उभारणी व्हावी, यासाठी साखर कारखान्यांना तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. महाप्रीत यांचेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्राथमिक विविधता तपासणी अहवाल (Feasibility Report) तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) यांची छाननी करून त्याबाबत साखर कारखान्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन देण्याचे काम ही समिती करणार आहे.
डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी आतापर्यंत पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत औद्योगिक धोरण यांचा प्रभावी समन्वय साधत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ सौर ऊर्जा प्रकल्पांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी निश्चितच होणार असून, त्यामुळे ही निवड विशेष महत्त्वाची ठरत आहे.
या निवडीमुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्याला सहकार व ऊर्जा क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. निवडीची बातमी समजल्यानंतर शेतकरी सभासद अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून सोशल मीडिया वरती अभिनंदन केले जात आहे.



