“मॅडम… सर… आम्हाला सोडून जाऊ नका!”- जि.प. प्रा.शाळा, श्रीपूर विद्यार्थी
शिक्षकांच्या बदल्याने श्रीपूर शाळा भावूक – विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले

विद्यार्थी संख्या 7 वरून 42 पर्यंतचा प्रवास – पवळ सर व राजगुरू मॅडमना विद्यार्थ्यांचा निरोप
श्रीपूर (ता. माळशिरस) –संपादक-दत्ता नाईकनवरे (इन महाराष्ट्र न्यूज)
“मॅडम… सर… आम्हाला सोडून जाऊ नका!” – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीपूर येथे निरोपाच्या वेळी विद्यार्थ्यांचे हुंदके दुमदुमत होते. डोळ्यांतून धारा वाहत होत्या, काही विद्यार्थी शिक्षकांना घट्ट मिठी मारून कोसळले होते. या क्षणी पालकही भावनिक झाले होते.
सन २०१८ मध्ये अजित सोपान पवळ सर आणि अशा लक्ष्मण हेळकर (राजगुरू) मॅडम यांनी या शाळेत रुजू होताना फक्त सात विद्यार्थी शाळेत होते. पण आज या दोघांच्या अथक प्रयत्नांनी पटसंख्या ४२ वर पोहोचली आहे. शाळेची उभी–आडवी प्रगती, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडींमध्ये मुलांची भरारी हा त्यांचा मोठा ठसा ठरला.
पालखी सोहळा, वृक्षदिंडी, स्नेहसंमेलन, दहीहंडी उत्सव – प्रत्येक उपक्रमात या शिक्षकांनी स्वतःला झोकून दिले. कोरोना काळात तर शाळेची इमारत स्वतःच्या खिशातून रंगवून भिंतींवर चित्रे व शैक्षणिक साहित्य उभे केले. उदास, जीर्ण शाळेला त्यांनी बोलकी आणि आकर्षक रूप दिले.
सामान्यतः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली पाच वर्षांनी होते. मात्र आठ वर्षांनंतर या दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याने निरोप सोहळ्यात दुःखाचे सावट पसरले. विद्यार्थ्यांनी कोट्यावधी आठवणींचा ओघ गाठीत ठेवला, पण डोळ्यांतून अश्रू गाळूनच शिक्षकांना निरोप दिला.
पालकांच्या डोळ्यांतूनही कृतज्ञतेचे अश्रू उमटले. “आमच्या लेकरांना खरी शाळा दाखवली, त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी जागवली, आमच्या घराघरांत आनंद दिला” – अशा शब्दांत पालकांनी सर–मॅडमना आशीर्वाद दिला.
या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अशा हेळकर (राजगुरू) मॅडम या लोकप्रिय सैराट चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची आई असल्याने त्या शाळेत आणि परिसरात एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांसाठी “रिंकूची आई” म्हणून त्यांचे नाव घराघरात पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या बदल्याच्या वेळी शाळेत दुहेरी भावनिक वातावरण होते.
विद्यार्थीप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि शाळेला नवीन ओळख देणाऱ्या या दोन्ही शिक्षकांना शेवटी उपस्थितांनी उभे राहून “मानाचा मुजरा” दिला. निरोपाचे अश्रू आणि आशीर्वाद यांच्या साक्षीने श्रीपूर शाळेच्या इतिहासात हा दिवस कायमस्वरूपी कोरला गेला.