माझ्या नातूचं सगळ्यात मोठं बारसं झालं – सौ.लताबाई यादव,महाळुंग
घुगऱ्या, पान सुपारी, लाडूचे व शिवचरित्र पुस्तकाचे देखील वाटप

शिवजन्मोत्सव 2023 राजेग्रुप महाळुंग-श्रीपूर – घुगऱ्या, पान सुपारी, लाडूचे व शिवचरित्र पुस्तकाचे देखील वाटप
श्रीपूर तालुका माळशिरस येथे राजेग्रुप महाळुंग-श्रीपूर कडून शिवजन्मोत्सव 2023 मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षीच शिवजन्मोत्सवाला आपण प्रति बाल शिवाजी पाळण्यामध्ये ठेवून, जसे एखाद्या लहान बाळाचे नाव ठेवताना सर्व पारंपारिक विधी, पाहुणचार करत असतो. परंतु यावर्षी या जन्मोत्सवाचे सार्थक झाले पाहिजे. म्हणूनच प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यापूर्वी जन्मलेल्या बाळाचा या शिव जन्मदिनी मुहूर्तावरती नामकरण सोहळा (बारसे) करायचा असा निर्णय राजे ग्रुपच्या सर्व महिला सदस्य व शिव मावळ्यांनी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी शिवजन्मोत्सवामध्ये प्रत्यक्ष त्या बाळाला आणून बारसे करण्याचे नियोजन केले. यासाठी महाळुंग आरोग्यवर्धने केंद्रातील अशा सेविका श्रीमती रूपाली अमोल रणे यांच्याकडून महाळुंग मधील एका यादव कुटुंबामध्ये सहा महिन्यापूर्वी एक बालक जन्माला आल्याची माहिती मिळाली. त्यांना सर्व कार्यकर्त्यांनी संपर्क साधून. त्या बाळाचे नाव बारसे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवण्याचे नियोजन केले.
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या देवन्या शिवतेसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, बाळाला पाळण्यामध्ये ठेवून व सर्व प्रमुख महिला, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी, पोवाडा, छत्रपती शिवरायांवरील पाळणा म्हणत, पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये नितीन आणि सारिका यादव या महाळुंमधील जोडप्याच्या बालकाचा नामकरण सोहळा शिवशाही पद्धतीने करण्यात आला.
या बाळाचे नाव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. सर्व महिला भगिनींना पान सुपारी, घुगऱ्या व लाडूचे देखील वाटप करण्यात आले. छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र माहिती करून देणारे पुस्तक देखील सर्वांना भेट देण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने महिला भगिनी, शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी यादव कुटुंबातील बाळाची आजी लता हनुमंत यादव म्हणाल्या, “माझ्या नातवाचे एवढ्या मोठ्या महिलांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आणि खास शिवजयंतीचा मुहूर्तावर चौकामध्ये एवढे मोठे बारसे केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. मी माझे, माझ्या कुटुंबाचे व माझ्या नातवाचे भाग्य समजते. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार देखील मानते.” असे त्या म्हणाल्या.
पारंपरा व सांस्कृतिक ठेवा जपत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार व दुग्धाभिषेक भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी कौस्तुभ गव्हाणे, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे, पैलवान अशोक चव्हाण, राजे ग्रुपचे अध्यक्ष बजरंग भोसले, परिसरातील सर्व नामवंत, ग्रामस्थ, शिवप्रेमी, मावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सायंकाळी लेझीम स्पर्धा, पोवाडे, पाळणा, नामकरण सोहळा (बारसे) खाऊवाटप, फटाक्यांची आतिषबाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देऊन जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.