पांडुरंग कारखाना व रोटरी क्लब अकलूजचा स्तुत्य उपक्रम | गरजूंना मिळाली दृष्टी
ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा आधार; श्रीपूर येथे नेत्र व मधुमेह तपासणी शिबिर यशस्वी

श्रीपूर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० रुग्णांची तपासणी, ७७ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
श्रीपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि Rotary Club of Akluj यांच्या पुढाकाराने H. V. Desai Eye Hospital, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना स्थळावर भव्य मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशा मोफत आरोग्य शिबिरांमुळे सर्वसामान्य व गरजू नागरिकांना मोठा आधार मिळतो. दृष्टी हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून वेळेवर तपासणी आणि उपचार होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
या शिबिरात एकूण ३०० रुग्णांची नेत्र व मधुमेह तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीत ७७ रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला त्या सर्वांना आयोजकांच्या वतीने मोहम्मदवाडी पुणे येथे नेऊन त्यांच्या डोळ्या वरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके यांनी दिली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष, केतन बोरावके यांनी रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य सुरू असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर, संचालक कल्पेश पांढरे, कारखाना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पोपळे, डॉ. प्रमोद पवार, डॉ. उत्तम खरात, डॉ. सुनिल फडे, डॉ. सलील तांबोळी, डॉ. सागर कोळेकर, नगरसेवक प्रकाश नवगिरे, सुभाष सोरटे तसेच कारखान्याचे केन मॅनेजर संतोष कुमठेकर, प्रोडक्शन मॅनेजर एम. आर. कुलकर्णी, वर्क्स मॅनेजर अमोल बारटक्के, इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे, परचेस मॅनेजर महेश देशपांडे, सेक्रेटरी भिमराव बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचाराची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या शिबिरामुळे अनेकांना नव्याने दृष्टी मिळाली आहे.



