महाळुंग मध्ये ‘महोत्सव दाखल्यांचा’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
असाच कॅम्प शाळा सुरू होण्या अगोदर श्रीपूर मध्ये ठेवण्याची नागरिकांची मागणी

आवश्यक २७८ चे वर दाखल्यांची नोंदणी
श्रीपूर प्रतिनिधी
श्रीपूर तालुका माळशिरस महाळुंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत ‘महोत्सव दाखल्यांचा’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, नवीन रेशन कार्ड काढणे, इ डब्ल्यू एस, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड संबंधित दाखले, जातीचे दाखले, डोमासाईल, नॉन क्रिमिलेअर, अशा अनेक आवश्यक दाखल्यांचा कॅम्प महाळुंग जि प शाळा येथे ठेवण्यात आला होता. या शिबिरामध्ये मिरे, बोरगाव, श्रीपूर महाळुंग, माळखांबी, नेवरे, उंबरे, बोरगाव येथील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी सहभाग नोंदविला.
या दाखले शिबिर महोत्सवाला नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये २७८ चे वर दाखल्यांची नोंदणी करण्यात आली आहे आणि यांना लगेच त्याचे वितरण देखील केले जाणार आहे अशी माहिती महाळुंग मंडल अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली. या शिबिरासाठी अकलूज उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम यांनी मार्गदर्शन केले होते.
सदर शिबिरासाठी मंडल अधिकारी विजय लोखंडे, ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल जगदाळे, सुदर्शन शिरसागर, श्वेता साखळकर, राहुल जमदाडे, परमेश्वर ढवळे, महाळुंग कोतवाल संभाजी चव्हाण, मंजुषा कोळी, अंकुश नवगिरे, दत्तात्रय साठे, बापू चंदनशिवे, महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तसेच श्रीपूर परिसरातील नागरिकांनी अशाच प्रकारचा दाखल्याचा कॅम्प शाळा सुरू होण्या अगोदर श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर मध्ये ठेवण्याची मागणी केली आहे.