शेतकऱ्यांच्या जळलेल्या मालाची योग्य नुकसान भरपाई देणार ! – राजेंद्र घोगरे,कोल्ड स्टोरेज मालक
सरासरी बेदाण्याला 130 रु. प्रती किलो मिळावेत - शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चा

अजून आग धुमसतेय, आग विजवण्याचे काम सुरू, जळालेला खराब माल बाहेर काढला जातोय.
महाळुंग ता. माळशिरस येथील राज ॲग्रो कोल्ड स्टोरेज अँड पॅक हाऊसला एक जूनला सायंकाळी अचानक आग लागून झालेल्या नुकसानांमध्ये कोल्ड स्टोरेज मालकाचे व शेतकऱ्यांनी ठेवलेल्या बेदाणा आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले आहे. यावर्षी बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे दर कमी होता म्हणून भविष्यात शेतकऱ्यांनी चांगला दर मिळावा या हेतूने या कोल्ड स्टोरेजला आपला माल ठेवला होता, परंतु अपघाताने लागलेल्या आगीमध्ये. सर्व कोल्ड स्टोरेज व ठेवलेला माल जळून खाक झाला आहे. अंदाजे दहा कोटी मालाचे व पंधरा कोटी कोल्ड स्टोरेजचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजून आग पूर्ण विजलेली नाही. खराब जळालेला बेदाणा आणि सोयाबीन माल बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे अजूनही अग्निशामकने पाणी मारून जळत असलेला माल विजवला जात आहे.
काही शेतकरी आपल्या मालाच्या नुकसान भरपाईसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. आमच्या मालाला योग्य भाव मिळावा, आमचा विचार कोल्ड स्टोरेजच्या मालकाने, शासनाने देखील नुकसान भरपाई साठी मदत केली पाहिजे, विमा कंपनीनेदेखील लवकर क्लेम दिला पाहिजे अशा प्रकारची निवेदने संबंधित विभागाला शेतकऱ्यांनी दिली आहेत.
“कोल्ड स्टोरेजचे व शेतकऱ्यांच्या मालाचे जळून पूर्ण नुकसान झाले आहे, सरासरी विचार करून त्यांच्या मालाला नुकसान भरपाई म्हणून लवकरात लवकर रक्कम प्रत्येकाला दिली जाईल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, योग्य मोबदला दिला जाईल! माझ्या कोल्ड स्टोरेजचे देखील मोठे नुकसान झाले आहे.”. असे राजेंद्र घोगरे स्टोरेज मालक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घटनास्थळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी स्टोरेजला भेट दिली त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संबंधित शेतकऱ्यांची व त्यांची बैठक पार पडली. यावेळी पंढरपूर तालुक्यातील जवळपास 45 गावातील बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्याला 130 रुपये प्रति किलो भाव मिळावा अशी चर्चा बैठकीत झाली .
स्टोरेजला माल ठेवलेले अनेक शेतकरी सध्या या घटनास्थळी भेट देण्यासाठी येत आहेत. त्यापैकी एक शेतकरी म्हणाले, “शेतकऱ्यांबरोबर स्टोरेज मालकाचेही मोठी नुकसान झाले आहे. तरी पण शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता बेदाण्याला बाजार भाव दोनशे रुपये असून, सध्य परिस्थितीचा विचार करून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्याला 130 रुपये प्रति किलो भाव मिळावा अशी चर्चा झाली आहे. तसेच दोन ते अडीच महिन्यात ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. स्टोरेज मालकाने योग्य भाव द्यावा. “- तानाजी कोरके, बेदाणा शेतकरी भोसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.