महाराष्ट्र

10 महिन्यात 2 एकरात केळीचे 15 लाखांचे उत्पादन | नरसिंह साळुंखे-श्रीपूर | Banana Export Rate

श्रीपूरच्या नरसिंह चंद्रकांत साळुंखे शेतकऱ्याला मिळाला प्रती क्विंटल 3000/- केळीला दर

श्रीपूरची केळी झाली एक्स्पोर्ट, मिळाला उच्चांकी दर | (Banana Got the Highest Price)

श्रीपूर : तालुका माळशिरस येथील साळुंखे कुटुंबीय गेली 25 वर्षापासून केळीची लागवड करत आहे. नरसिंह चंद्रकांत साळुंखे यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेऊन पारंपरिक शेतीस नवीन तंत्रज्ञानाची जोड देत, दुष्काळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्यातक्षम केळीचे नियोजनबद्ध यशस्वी उत्पादन घेतले. त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये केळी पिकात उल्लेखनीय उत्पादन घेतले आहे. पंचवीस वर्षाच्या काळामध्ये चालू सीझनला त्यांच्या केळीला सर्वाधिक तीन हजार रुपये क्विंटल दर मिळाला आहे (Banana Got the Highest Price) व त्यांची केळी, लवंग येथील व्ही आर ऍग्रो एक्सपोर्ट कंपनीने इराण येथे निर्यात केली आहे. 

नरसिंह साळुंखे यांनी 2 एकर क्षेत्रांत 15 फेब्रुवारी 2023  रोजी  केळी पीक लागवड केली. 7 फूट ओळीत, रोप (7×5) अशी लागवड केली. दहाव्या महिन्यातच त्यांची केळी निर्यातीसाठी सज्ज होऊन इराण देशांमध्ये सदर केळीची निर्यात करण्यात आली आहे.

नरसिंह साळुंखे यांंना या वर्षी सुरु लागणीच्या केळीला 30 रुपये प्रति किलो भाव भेटला आहे. केळीचे क्षेत्र 2 एकर असून त्यात रोपांची संख्या 2500 आहे. साधारण सरासरी एका घडाचे वजन 25 ते 30 किलो पर्यंत मिळत आहे. त्यामुळे या दोन एकरांत 50 ते 60 टन उत्पन्न अपेक्षित आहे.

पाणी व्यवस्थापन …

केळीला सध्या ड्रिपव्दारे पाणी द्यावे लागते. उसाच्या तुलनेत पाणी जास्त लागते. रोज साधारण 1 ते 3 तास पाणी द्यावे लागते. झाडे पक्वतेच्या काळात योग्य नियोजन करून पाणी व खत याचा ताळमेळ घातल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळेल. 10 डिसेंबर पासून सध्या काढणी चालू झाली असून पहिल्या टप्प्यात 10 टन माल निघाला आहे. तो 30 रु. प्रतिकिलो प्रमाणे दर मिळाला असून त्याचे उत्पन्न 3 लाख रुपये मिळाले आहे.

येत्या 30 ते 40 दिवसांत संपूर्ण काढणी होईल. अपेक्षित उत्पन्न आणखी जास्त निघेल, असा अंदाज आहे. जर बाजारभाव टिकून राहिला तर 10 ते 15 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

खर्च नियोजन…

2500 रोपांचा 50 हजार रुपये खर्च, ड्रिप 60 हजार रुपये खर्च, नांगरणी, फणणी, रानाची मशागत यासाठी 20 हजार रुपये खर्च आला आहे. केळीसाठी खते व औषधे एकरी एक लाख रुपये असे दोन एकराला दोन लाख रुपये आला आहे. असा सर्व खर्च 2 एकराचा 3 लाख 10 हजार रुपये झाला आहे. सर्व खर्च वजा जाता 8 ते 10 लाख भेटतील. (बाजार 30 रुपये प्रतिकिलो भाव टिकून राहिल्यास).

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यातीत प्रथम क्रमांक लागतो. माळशिरस तालुक्यामधील अनेक गावात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली आहे. श्रीपूर येथील प्रगतशील शेतकरी नरसिंह साळुंखे यांनी दोन एकरांत, 10 ते 12 महिन्यांत 10 लाखांचे उत्पादन घेऊन शेती व्यवस्थापनाचे वेगळेपण दाखवून दिले आहे.

“आखाती देशांमध्ये महाराष्ट्रतील केळीला मोठी मागणी असते, महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत अग्रेसर ठरलेला असताना सरकारने याकडे धोरणात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे, जास्त आवक असलेल्या काळात नाशवंत मालाची कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे प्रकार सर्रास घडतात, चिलिंग, तांबेरा, करपा, सिगाटोका, आळी, डास इ. प्रादुर्भावाची भर त्यात पडतच असते. त्यामुळेच कित्तेक वेळा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो, यासाठी केळी दर व व्यापाऱ्यांवर सरकारकडून अंकुश असणे गरजेचे आहे.”नरसिंह चंद्रकांत साळुंखे-निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी, श्रीपूर, जि. सोलापूर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!