पिडीतेला न्याय | तीन आरोपींना २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा | वेळापूर पोलिसांचा प्रभावी तपास
माळशिरस न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – तीन गुन्हेगारांना २० वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात तिघांना २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
पिडीतेला न्याय — तीन आरोपींना २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
अकलुज प्रतिनिधी | इन महाराष्ट्र न्यूज पोर्टल
माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी आणि खंडाळी येथील तिघा तरुणांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायालय, माळशिरस यांनी प्रत्येकी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. वेळापुर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या या गंभीर गुन्ह्याचा निकाल नुकताच लागला असून न्याय मिळाल्याने पीडित कुटुंबाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा र.नं. ३५५/२०२१ भादंवि कलम ३७६, ३७६(ए), ३५४, ५०६, ३४ तसेच अॅट्रोसिटी कायदा कलम ३(१)(W), ३(२)(V), ३(२)(va) आणि पोक्सो कायद्याचे कलम ४, ८, १२, १७ अंतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी १) युवराज प्रकाश गोडसे, २) रणजित दत्तात्रय कोळेकर (दोघे रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) व ३) रोहन दत्तात्रय भोसले (रा. खंडाळी, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
खटल्यातील साक्षी आणि पुरावे ठरले निर्णायक
मा. विशेष न्यायालय, माळशिरस येथे खटला चालला. या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासले गेले. त्यात पिडीता, तिची आई व ओळख परेड घेणारे कार्यकारी दंडाधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपी रोहन भोसले याची ओळख परेड यशस्वी झाली होती. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिन्ही आरोपी दोषी ठरवले.
न्यायालयाचा निर्णय
मा. श्री. ताम्हाणेकर, विशेष न्यायाधीश, माळशिरस यांनी आरोपी युवराज गोडसे, रणजित कोळेकर आणि रोहन भोसले यांना प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा ठोठावली.
कारवाईमागील अधिकारी आणि न्यायालयीन टीमचे योगदान
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी केला. तपासात सपोनि. गणेश निंबाळकर यांनी मदत केली.
सरकारी बाजूने श्री. मंढेगिरी, श्री. ढवळे व श्री. संग्राम पाटील यांनी सरकारी वकिल म्हणून पैरवी केली.
संपूर्ण तपास व न्यायालयीन कारवाईदरम्यान अकलुज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष वाळके व वेळापूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांनी मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी अधिकारी पो.स.ई. विजय जाधव तसेच कोर्ट पैरवी अंमलदार पोहेकॉ कदम व पो.कॉ. काटे यांनी कार्य पाहिले. या निकालामुळे पोलिस विभागाने प्रभावी तपास व न्यायालयीन प्रक्रियेत काटेकोर तयारी केल्याबद्दल नागरिकांकडून प्रशंसा होत आहे.



