महाराष्ट्र

महाळुंग | निकृष्ट कामामुळे मंदिर परिसर धोक्यात; लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महाळुंग ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप

यमाई देवी मंदिरासमोर निकृष्ट गटार कामाचा फटका; सहा वाहने अडकली, प्रशासन गप्प

महाळुंग : अष्टमीमध्ये धोक्याची घंटा! महाळुंगमध्ये मंदिरासमोर गटारामुळे अपघाताचा धोका

महाळुंग : येथील जागृत ग्रामदैवत यमाई देवी मंदिर समोर बांधण्यात आलेल्या गटाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भाविक भक्त आणि स्थानिक ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंदिरासमोरील गटारावरील बांधकाम ढिसाळ झाल्याने त्यावरून वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. परिणामी, आतापर्यंत सुमारे सहा वाहने गटारामध्ये अडकली असून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

महाळुंग मध्ये  यमाई देवीचे नवरात्र व अष्टमी हे दोन उत्सव असतात, त्यावेळेला भाविक भक्तांची मोठी गर्दी असते तसेच मंगळवार, शुक्रवारी  आणि दररोज या ठिकाणी भाविक भक्त नियमित  दर्शनासाठी येत असतात.  मंगळवारी भाविक भक्त बाहेरून दर्शनासाठी आल्यावर त्यांची गाडी सदर गटारांमध्ये अडकल्याने त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला.

गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच अष्टमीची यात्रा अगदी जवळ आल्यामुळे लाखो भाविक या ठिकाणी दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत गटाराची ही धोकादायक अवस्था भविष्यात मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

यमाई देवी मंदिर केंद्राच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे  ते देखील या ठिकाणी  वेळेत कामे करत नाहीत. निर्णय घेत नाहीत त्यामुळे याचा त्रास भाविक भक्तांना ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. 

वाहने अडकल्यानंतर प्रत्येकवेळी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ती बाहेर काढली आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाविक भक्त आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

अष्टमी यात्रेपूर्वी तातडीने गटाराची दुरुस्ती करून सुरक्षित व्यवस्था करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांकडून दिला जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!