महाराष्ट्र

पुणे–सोलापूर महामार्गावर हळहळजनक दुर्घटना; पनवेलच्या पाच जिवांचा अंत

 मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे देवडी पाटी येथे घडली घटना

पुणे–सोलापूर महामार्गावर काळाचा घाला; पाच मित्रांचा जागीच अंत, एक महिला मृत्यूशी झुंज देते

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्री काळजाला चटका लावणारा भीषण अपघात घडला. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे देवडी पाटी येथे दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रमंडळींच्या एरटीका कारचा (MH-46 Z 4536) भीषण अपघात झाला.

कारचालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की वाहन अक्षरशः चेंदामेंदा झाले. अपघात इतका भयंकर होता की कार रस्त्यापासून सुमारे १० ते १५ फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकलेली आढळून आली.

या कारमध्ये एकूण सहा प्रवासी (तीन पुरुष व तीन महिला) होते. सर्वजण पनवेल परिसरातील मित्र असल्याचे समजते. आनंदात देवदर्शनासाठी निघालेला प्रवास क्षणातच मृत्यूच्या सावलीत गेला.

या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्योती जयदास टकले (वय ३७, रा. सेक्टर नं. १३, पनवेल) या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.

अपघातानंतर मृतदेह पूर्णपणे वाहनात अडकलेल्या अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढले व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.

मृतांची नावे :

  1. माला रवी साळवे (वय ४०), रा. पंचशील नगर झोपडपट्टी, सेक्टर १८, न्यू पनवेल
  2. अर्चना तुकाराम भंडारे (वय ४७), रा. सेक्टर ७, खांदा कॉलनी, पनवेल वेस्ट
  3. विशाल नरेंद्र भोसले (वय ४१), रा. आरबीआय एमएसओ, रूम नं. ८, रेल्वे कॉलनी, पनवेल स्टेशनजवळ
  4. अमर पाटील, रा. खारघर
  5. आनंद माळी

या घटनेमुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली असून एकाच वेळी पाच जिवांचा अंत झाल्याने नातेवाईक व मित्रपरिवाराचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!