
राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (security audit) करण्यात यावे. तसेच बसस्थानक व आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक आढावा बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात झाली. बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एस टी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.