आशा सेविकांनी वाचला डॉक्टरच्या तक्रारींचा पाढा | चौकशी दरम्यान आशा सेविकांना अश्रू अनावर
संबंधित डॉक्टर हजर नसल्यामुळे त्यांचे म्हणणे मांडले नाही | महाळुंग-श्रीपूर आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अंधागोंदी कारभार

महाळुंग-श्रीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नक्की चालले काय? चौकशी समिती पुढे अनेक धक्कादायक गोष्टी आल्यापुढे !
संबंधित डॉक्टर हजर नसल्यामुळे त्यांचे म्हणणे मांडले नाही.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील उजनी कॉलनी येथे असणारे सुसज्ज कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या महाळुंग-श्रीपूर आरोग्य केंद्रामध्ये गेले अनेक दिवसापासून तेथील आरोग्य अधिकारी डॉ.सचेतन घोडके यांच्या विरुद्ध तेथील विभागात काम करणाऱ्या सर्व आशा सेविकांनी तक्रारीचे निवेदन वरिष्ठांना दिले होते. त्या संदर्भात आज माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे व त्यांच्या इतर चौकशी समिती मधील सदस्यांनी आरोग्य केंद्रात येऊन चौकशी केली.
यावेळी सर्व आशा सेविकांनी काम करीत असताना वैद्यकीय अधिकारी घोडके यांच्याकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असून. अनेक वेळा पीएसी मधून हाकलून बाहेर देखील काढले आहे. वरिष्ठ इतर कर्मचाऱ्यांचा देखील मान ठेवला जात नाही. रात्री आशा सेविकांना फोन करून पेशंटच्या घरी जाण्यासाठी सांगतात, काम सांगण्याची भाषा नीट वापरत नाहीत. आशा सेविकांचे दप्तर संबंधित अधिकारी न तपासता इतर अधिकार नसणाऱ्या व्यक्तीकडून तपासणी करून घेतात. अशा अनेक तक्रारी चौकशी समितीच्या निदर्शनाखाली आणून देऊन, वैयक्तिक सांगून, त्या संदर्भात लेखी म्हणणे प्रत्येकीने दिले आहे.
कायम कर्मचारी पगार घेऊन घरी व त्या ठिकाणी दुसरे कर्मचारी काम करीत असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनाखाली आले आहे. डॉ. घोडके यांचे एखाद्या कर्मचाऱ्याने ऐकले नाही तर, मनामध्ये खुन्नस धरून कर्मचाऱ्यांना ते धारेवर धरतात, विनाकारण त्रास देतात असे देखील समिती पुढे सांगण्यात आले.
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे आरोग्य विभागाचे सभापती सोमनाथ मुंडफणे व इतर गावकरी देखील आक्रमक झाले होते. डॉक्टरचा मनमानी कारभार सुरू आहे. अनेक वस्तू इथल्या गायब झाले आहेत. या ठिकाणी डिलिव्हरी केल्या जात नाहीत. अनेक पेशंटला तपासले जात नाही, हात देखील लावला जात नाही, नुसत्या गोळ्या देऊन पाठविले जाते. ऍडमिट करून घेतले जात नाही. उपकेंद्रावरील आशा सेविकांना व कर्मचाऱ्यांना आरोग्यवर्धिनी केंद्रात बोलून याच ठिकाणी सह्या कराव्या लागत आहेत. आजपर्यंत भीती पोटी व कारवाईपोटी या ठिकाणच्या आशा सेविका व इतर कर्मचारी डॉक्टरच्या विरोधात तक्रारी देत नव्हते, परंतु सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यावर सर्व तक्रारदार कर्मचाऱ्यांनी, आरोग्य सेविकांनी, इतर कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, होत असलेल्या अन्याय विरुद्ध आवाज उठवला आहे. व सदर डॉक्टरची या ठिकाणाहून ताबडतोब बदली करून चांगला काम करणारा आरोग्य अधिकारी या ठिकाणी नेमून सर्व प्रकारच्या सुविधा या केंद्रांमध्ये मिळाव्यात अशी मागणी केली आहे. या त्रास देत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्याला आम्ही येथे येऊ देणार नाही, काम करू देणार नाही असे देखील नागरिकांनी सांगितले आहे.
या तक्रारी विषयासंदर्भाची सखोल चौकशी झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थ, आशा सेविका, इतर कर्मचारी, वाईट अनुभव आलेले रुग्ण, यांचे लेखी म्हणणे घेतले आहे. सदर चौकशी अहवाल ताबडतोब जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे सर्व तक्रारी आणि चौकशी समितीचा अहवाल पाठवून डॉक्टर वरती योग्य कारवाई केली जाईल असे सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्व शस्त्रक्रिया करण्याची साधनसामग्री असताना, ऑपरेशन थेटर असताना, ऍडमिट करून घेतले जात नाही, उपचार केले जात नाहीत, रुग्णांच्या नातेवाईकांना हेलपाटे दिले जातात, सर्व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी खोल्या असताना देखील, आज तगायत त्यांना खोल्यांच्या चाव्या दिल्या नाहीत, काही कर्मचारी खोल्या असून, राहण्यासाठी न दिल्यामुळे अकलूजला राहत आहेत. असे देखील इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्थानिक आरोग्य समिती देखील अद्याप निवडली गेली नाही.
यावेळी सर्व पीडित आशा सेविका, योग्य व वेळेत उपचार न केलेले तक्रारदार रुग्ण, स्थानिक ग्रामस्थ, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत आरोग्य विभागाचे सभापती सोमनाथ मुंडफने, डॉक्टर संजय लाटे, मा.जि.प.सदस्य सुहास गाडे, संचालक सागर यादव, सुधीर भोसले, रशीद मुलानी, विपिन सूर्यवंशी उपस्थित होते.
एकंदरीत अशा आरोग्य अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून ताबडतोब त्याच्यावरती योग्य कार्य करण्यात यावी. बदली करण्यात यावी, तक्रारीच्या मुळाशी जाऊन न्याय मिळावा, पुन्हा अशा प्रकारच्या घटना, तक्रारी होणार नाहीत याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्त ताकीद द्यावी. नुसते कागदी घोडे, नाचवून आणि चौकशी अहवाल सादर करून तात्पुरता प्रश्न मिटविला तर भविष्यामध्ये या ठिकाणच्या नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची परिस्थिती दिसून येत आहे.
तुटपुंजा मानधनावरती, घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देणाऱ्या, वेळेत मानधन मिळाले नाही तरी प्रामाणिक काम करणाऱ्या, आशा सेविकांच्या तक्रारीची दखल आरोग्य विभागाने, आरोग्य मंत्र्यांनी, सोलापूर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी तात्काळ घ्यावी.