शाळेची बेल, प्रार्थना आणि जुन्या बाकांवर पुन्हा मैत्रीचा जल्लोष
व्हॉट्सॲप ग्रुपमधून जुळले पुन्हा मैत्रीचे धागे; श्रीपूर येथे माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा

श्री चंद्रशेखर विद्यालय 1993-94 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
श्रीपूर : तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय इयत्ता दहावी 1993-94 बॅचच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा 32 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आलेल्या मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत हा संस्मरणीय मेळावा साजरा केला.

रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी सर्व माजी विद्यार्थी श्रीपूर येथील शाळेच्या प्रांगणात एकत्र जमले. यावेळी जुन्या आठवणी जाग्या करत शाळेची बेल वाजविण्यात आली तसेच प्रार्थनाही घेण्यात आली. त्यानंतर सर्वांनी ज्ञानमंदिरात प्रवेश करून कै. चंद्रशेखर आगाशे साहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले. विशेष म्हणजे 32 वर्षांपूर्वी ज्या वर्गामध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्या वर्गामध्ये जाऊन प्रत्येकाने आपल्या जुन्या बाकावर बसत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी कलाशिक्षक मोहन भगत सर, माजी पर्यवेक्षक माधव साठे सर, माजी पर्यवेक्षक जयंत मस्कर सर, माजी मुख्याध्यापक नागनाथ वाघमारे सर तसेच माजी मुख्याध्यापक विनायक जोशी सर यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानानंतर गुरुजनांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सर्वजण चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे स्नेहमेळाव्यासाठी रवाना झाले. चिंचणी गावात प्रवेश करून सर्वांनी पर्यटनस्थळांना भेट दिली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
दुपारच्या सत्रात कार्यक्रम हॉलमध्ये सर्वांनी आपली ओळख करून दिली. जुन्या आठवणी, शालेय जीवनातील किस्से, विनोद आणि गप्पांमध्ये सर्वजण रमून गेले होते. अनेकांनी ग्रुप फोटो काढत हा आनंददायी क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी पोलीस इन्स्पेक्टर समाधान पवार, संजय पाटील (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष), नवनाथ लोखंडे सर, ज्ञानेश्वर काटे, सचिन नागणे, धनाजी तळे, संजय ओव्हाळे, रवींद्र सावंत पाटील, रमेश पिसाळ, राजू खंडागळे, संतोष यादव तसेच इतर स्थानिक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले.



