अनेक महिला जखमी | वड पूजेसाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला
श्रीपूर तालुका माळशिरस मधील घटना

श्रीपूर तालुका माळशिरस येथे सकाळ पासूनच वट सावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त सर्व महिला भगिनी सौभाग्याचे अलंकार घालून व नटून-थटून वडाची पूजा करण्यासाठी श्रीपूर आनंदनगर मधील सर्वात मोठ्या जुन्या वडाच्या झाडाची पूजा करून फेरे मारत होत्या. अतिशय भक्तीमय वातावरणामध्ये शेकडोच्या संख्येने महिला या ठिकाणी पूजा करीत होत्या.
दुपारी दोनच्या सुमारास अचानक त्याच वडाच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्या वरील मधमाशा उठून.खाली पूजा करणाऱ्या महिलांवरती त्यांनी हल्ला केला. महिला व लहान मुले सैरावरा इकडून तिकडे पळू लागले. महिलांच्या साड्यांवरती, डोक्यांवरती आणि त्यांच्या अंगावरती, मधमाशा बसून चावा घेत होत्या. झाडावरती भले मोठे आगी मोहोळाचे पोळे होते. त्या सर्व मधमाशा उठून वडाच्या झाडाखालील परिसरामध्ये व आसपासच्या शेजाऱ्यांच्या घरासमोरील अंगणात आल्या होत्या.
सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला, कोणाला काय झाले हे लवकर कळेना, आई सोबत आलेल्या लहान मुलांची देखील धावाधाव रडारड सुरू झाली. हातामध्ये पूजेचे ताट आणि मधमाशा पासून बचाव करण्यासाठी सर्व सुहासिनी महिला चारी दिशेने पळत होत्या. मधमाशांच्या चाव्यामुळे अनेक महिला, लहान मुले जखमी झाली आहेत. अनेक लहान मुलांना व वीस ते पंचवीस महिलांना मधमाश्या चावल्या मुळे सणाच्या दिवशी वडपूजेच्या वेळी हा अनर्थ घडला आहे. काही महिलांना पूजा न करताच परत घरी जावे लागले तर काहींनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन वडाच्या झाडाची पूजा केली.
दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळपासून वडाच्या झाडाखाली पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती. घरातील काम उरकून वेळ मिळेल तशा महिला त्या ठिकाणी वडाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येत होत्या. या घटनेमुळे दुपारनंतर या झाडाखाली फक्त मांडलेली पूजा, फेऱ्या मारून बांधलेले दोरे, पूजेचे साहित्य एवढेच वडाखाली दिसून आले. पूजेसाठी आलेल्या महिलांवर मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.