ग्रामीण रस्ते नकाशावर दाखल करण्याची मोहीम – सेवा पंधरवड्यात ग्रामस्थांचा सहभाग
“तहसीलदार सुरेश शेजुळ यांचे आवाहन – नकाशावर नसलेले सर्व रस्ते आता दाखल होणार”

ग्रामीण भागातील रस्ते नकाशावर आणण्यासाठी सेवा पंधरवडा अभियानाची जोरदार सुरुवात – तहसीलदार सुरेश शेजुळ
माळशिरस (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रीय नेता पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जयंती दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत तालुक्यात “सेवा पंधरवडा अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वापरात असलेले पण नकाशावर नोंद न झालेले सर्व रस्ते नकाशावर आणण्याची मोहीम सुरू असून, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले.
मौजे तरंगफळ येथे सेवा पंधरवडा निमित्त आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांकडून सुचविण्यात आलेल्या रस्त्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांची नोंद नकाशावर करण्याचे नियोजन करण्यात आले.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मिनीताई नारायण तरंगे होत्या. यावेळी माळशिरस मंडलाधिकारी विजय लोखंडे, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी नागटिळक, कृषी सहाय्यक नितीन शिंदे, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, उपसरपंच सागर बोडरे, सामाजिक कार्यकर्ते नारायण तात्या तरंगे, दिव्यांग संघटनेचे नेते, ग्रामपंचायत सदस्य गोरख जानकर, बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन व माजी सरपंच सुजित तरंगे, माजी सरपंच महादेव तरंगे, माजी संचालक जयंतीलाल तरंगे, संपत साळवे, दादासो तरंगे, मानाप्पा तरंगे, अभिजीत जगताप, दादासो बागाव, अविनाश मोहिते यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, कार्यकर्ते, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लहान-सहान रस्ते नकाशावर दाखल होऊन भविष्यातील विकासकामांना गती मिळणार आहे.