पांडुरंग कारखान्याची ३४ वी सभा उत्साहात; एमएसपी वाढीची गरज अधोरेखित
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस उत्पादनवाढ – ६० शेतकऱ्यांना एआय मार्गदर्शन

श्रीपूर (ता. माळशिरस) –दत्ता नाईकनवरे संपादक इन महाराष्ट्र न्यूज
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २० सप्टेंबर) श्रीपूर येथील कारखाना स्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सुरुवातीला दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहून आणि संस्थापक सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेचा शुभारंभ झाला.
सभेत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी १३ विषय मांडले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक उमेश परिचारक, दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, प्रणव परिचारक यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कामगार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करताना चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले की, केंद्र शासनाने चालू गाळपास ऊसाची एफआरपी ३५५० रुपये केली आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढत्या उत्पादन खर्चामुळे साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवणे तातडीने गरजेचे आहे.
परिचारक यांनी स्पष्ट केले की, २०१९ पासून साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही. एक वेळेस ती ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली होती. परंतु सध्या उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे साखरेची एमएसपी किमान ४००० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल असणे आवश्यक आहे. अन्यथा साखर उद्योगावर गंभीर आर्थिक संकट ओढावू शकते.
यंदाच्या गाळप हंगामाबाबत माहिती देताना परिचारक म्हणाले की, पांडुरंग कारखान्याकडे जवळपास १२ लाख मेट्रिक टन उसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये खोडव्याचे प्रमाण अधिक आहे. कारखान्याने या हंगामात साडेनऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५ ऑक्टोंबरनंतर कारखाना सुरू होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना सर्वाधिक एफआरपी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास कारखान्याने सुरुवात केली आहे. ६० शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सामावून घेत त्यांच्या उसाच्या उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी ऊस भूषण व आदर्श शेतकरी पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
“पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार” सोमनाथ नवनाथ मोरे यांना एक लाख रुपये रोख बक्षीसदेऊन सहपत्नी गौरवण्यात आले. तसेच आदर्श शेतकरी पुरस्कार शिवाजी श्रीमंत रोंगे,सौदागर दिगंबर कदम,रामचंद्र उत्तम गायकवाड,अनिल हणमंत शिंदे, शुक्राचार्य खंडू गवळी,विजय बापू पाटील,विजय अंगद जाधव, यांना सहपत्नी सन्मान करून पंचवीस हजार रुपये रोख बक्षीसदेऊन गौरवण्यात आले.