विचारांची शिक्षिका नूरजहाँ शेख यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराचा मान
साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांवर उज्वल कामगिरी — नूरजहाँ शेख गौरविण्यात

संपादक – दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज श्रीपूर
फिनिक्स स्कूलच्या संस्थापिका नूरजहाँ शेख यांना ‘राष्ट्रीय भारत भूषण’ पुरस्कार जाहीर
अकलूज दि.१३ (प्रतिनिधी) गणेशगाव (ता. माळशिरस) येथील फिनिक्स स्कूलच्या संस्थापिका व अध्यक्षा नूरजहाँ फकरूद्दिन शेख यांची राष्ट्रीय भारत भूषण आदर्श मुख्याध्यापिका, साहित्यिका व समाजसेविका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे.
शेख यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, तसेच समाजकल्याण, महिला सशक्तीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेले उपक्रम यामुळे त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
साहित्यिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांना आपल्या लेखणीतून त्यांनी प्रखर आवाज दिला आहे. त्यांच्या लेखनात विचारांना दिशा देणारी आणि मनाला स्पर्श करणारी संवेदनशीलता दिसते. शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांचा संगम साधणाऱ्या नूरजहाँ शेख या खऱ्या अर्थाने ‘विचारांची शिक्षिका’ आणि ‘संवेदनांची लेखिका’ म्हणून ओळखल्या जातात.
या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतभरातून साडेचार हजार प्रस्ताव प्राप्त आले होते. त्यामधून शेख यांची निवड हा मोठा गौरव मानला जात आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा १६ नोव्हेंबर रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे होणार असून, या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज भोसले, प्रा. शंकर अदानी, सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, सिने अभिनेते युवराज कुमार आणि कवियत्री वैशाली शेलार उपस्थित राहणार आहेत.
या सन्मानाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे व उपाध्यक्ष विकास उबाळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.



