अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत १५१ उमेदवारांचे अर्ज दाखल
घोषणाबाजीदरम्यान अकलूज पोलिसांचा प्रशंसनीय बंदोबस्त

नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात; तणावानंतर अकलूज पोलिसांनी काही मिनिटांत परिस्थिती शांत केली
अकलूज दि.18 (प्रतिनिधी)
अकलूज तालुका माळशिरस येथे नगरपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोहिते–पाटील समर्थक व राम सातपुते समर्थक यांच्यात घोषणाबाजी झाल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. परंतु अकलूज पोलिसांनी तत्काळ घेतलेल्या चोख बंदोबस्त व संयमी भूमिकेमुळे अवघ्या काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आली, आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. स्थानिक नागरिक व उमेदवारांकडून अकलूज पोलिसांच्या तत्पर कारवाईची प्रशंसा करण्यात येत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूज गावाच्या ग्रामपंचायतीचे जवळपास ९९ वर्षांनंतर नगरपरिषदेत रूपांतर झाले. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीला वाढती लोकसंख्या आणि कमी निधी या कारणांमुळे सर्व अकलूजकरांनी ४३ दिवस केलेल्या उपोषणानंतर नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. सुमारे तीन ते चार वर्षे प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत कारभार सुरू राहिल्यानंतर अखेर पहिल्या नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), महाराष्ट्र विकास सेना, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनी दिवसभर अर्ज दाखल करण्याची लगबग दिसली.
नगरसेवक पदासाठी आजपर्यंत १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, नगराध्यक्ष पदासाठी ७ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यात सुवर्णा साठे (महाराष्ट्र विकास सेना), उषा कांबळे (वंचित बहुजन आघाडी), पूजा कोतमीरे (भाजप), रेश्मा आडगळे (राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गट), दिव्यांनी रास्ते (राष्ट्रवादी – अजित पवार गट), प्रतिभा गायकवाड (राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गट) आणि उमा गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे.
आज अर्जांची छाननी होणार असून, दि.१९ ते २१ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. दि.२२ ते २५ नोव्हेंबर न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. दि.२६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व दि.२७ नोव्हेंबरपासून प्रचारयात्रांना सुरुवात होणार आहे. दि.२ डिसेंबरला मतदान आणि दि.३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.



