प्राचार्यांनी केला अकलूज पोलिसांना कॉल | श्रीपूरच्या शाळेवर राडा
बाहेरच्या मुलाने काढली मुलीची छेड | पालक व स्थानिकांची परिसरात गर्दी

शाळा प्रशासनाची तात्काळ बैठक, घेतला महत्वाचा निर्णय
शालेय विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणालाही शाळेच्या कॅम्पस मध्ये प्रवेश नाही, तसे आढळून आल्यास तात्काळ पोलिसांकडून कारवाई करणार असल्याचे बैठकीमध्ये ठरले आहे.
श्रीपूर (ता. माळशिरस) — श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय येथे सुरू झालेल्या क्रीडा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या बाहेरच्या मुलांनी स्पर्धेच्या ठिकाणी खेळाच्या मैदानाजवळ प्रवेश करून त्यातील एकाने मोबाईलने मुलींचे खेळतानाचे व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेमुळे शाळा परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकामध्ये आणि स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात झाल्यानंतर काही वेळातच संबंधित युवक मैदानात प्रवेश करून मुलींचे शूटिंग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. प्राचार्य पांडुरंग बनसोडे यांनी त्या युवकाला दोनदा मैदानातून बाहेर काढले तरीही तो शिक्षकांचा डोळा चुकवून पुन्हा शाळेच्या मैदानात प्रवेश करत होता. एका विद्यार्थिनीनेही “हा मुलगा मला त्रास देतोय” अशी तक्रार प्राचार्यांकडे केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्राचार्यांनी तात्काळ अकलूज पोलिसांना कॉल केला. काही वेळातच पोलीस हवालदार समाधान देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गायकवाड, देवकर, निर्भया पथक आणि ट्रॅफिक विभागाचे पोलीस शाळेत दाखल झाले. पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन अकलूज पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेले.
वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राचार्यांनी, शाळा प्रशासनाचे अधिकारी, सर्व शिक्षक, सेवक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेऊन सर्वांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी व क्रीडा सप्ताह, स्नेहसंमेलनावेळी सुरक्षेविषयी विषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
घटनेची माहिती परिसरात कळताच पालक, स्थानिक नागरिक आणि युवकांची शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मुलींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रत्येक वर्षी क्रीडा सप्ताहात किरकोळ गोंधळ असतो; मात्र यावर्षी पहिल्याच दिवशी मुलींच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर घटना घडल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. शाळेच्या मागील बाजूने पूर्ण सुरक्षित भिंत उभारण्याची, शाळेत कायम सुरक्षा रक्षक नेमण्याची तसेच स्नेहसंमेलनाच्या काळात फक्त विद्यार्थी आणि पालकांनाच पासद्वारे प्रवेश देण्याची मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे.



