महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी अकलूजच्या कु.प्रगती मोहिते

फुले विचारांचा जागर : आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कु.प्रगती मोहिते

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी कु.प्रगती राजू मोहिते यांची निवड

(अकलूज प्रतिनिधी : केदार लोहकरे)

महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ च्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील नवोदित कवयित्री कु.प्रगती राजू मोहिते यांची निवड करण्यात आली आहे.

हा चार दिवसांचा भव्य साहित्यिक महोत्सव दि. २, ३, ४ व ५ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशन समाजभवन येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील तसेच परदेशातील कवींना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा फेस्टिव्हल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व संविधानवादी विचारधारेवर आधारित कविता सादरीकरणासाठी आयोजित करण्यात येतो. यासाठी कवी- कवयित्रींची निवड प्रक्रिया राबविण्यात आली असून निवड झालेल्या कवींना महोत्सवात कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.

या मानाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अकलूजच्या कु.प्रगती राजू मोहिते यांची निवड झाल्याने अकलूज शहराच्या साहित्यिक क्षेत्राला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या महोत्सवामुळे नव्या पिढीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

निवड झालेल्या सर्व कवींनी दि. २ जानेवारी २०२६ रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कु. प्रगती प्रिया राजू मोहिते यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची गोडी असून त्यांनी इयत्ता चौथीत शिकत असतानाच कवितालेखनास सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी ३० हून अधिक कविता लिहिल्या असून त्या विविध सामाजिक, भावनिक व वैचारिक विषयांवर आधारित आहेत.

त्यांच्या कवितांमध्ये एकांत, आत्मशोध, निसर्ग, भावना, संघर्ष आणि जीवनातील सूक्ष्म जाणिवांचा सुंदर संगम दिसून येतो. नव्या पिढीतील संवेदनशील कवयित्री म्हणून त्यांच्या कवितेतील शब्द मनाला स्पर्श करणारे व विचारप्रवर्तक ठरतात.

लवकरच त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित होणार असून साहित्य क्षेत्रात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!