गिरझणी येथील जवानाचे प.बंगाल येथे शारीरीक अपघाताने दुख:द निधन | Girzani | Akluj |
पंधरा दिवसांमध्ये सेवा निवृत्त होणार होते | भारतीय सैन्यात नाईक पदावर पश्चिम बंगाल येथे कार्यरत होते |

पंधरा दिवसानंतर सेवानिवृत्त होणार होते…
अकलूज प्रतिनिधी
गिरझणी ता.माळशिरस येथील भारतीय सैन्यात नाईक पदावर कार्यरत असलेले जवान लक्ष्मण संजय पवार यांचे प.बंगाल येथील बाग -डोगरा येथे शारीरीक अपघाताने निधन झाले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, लक्ष्मण संजय पवार 33 वर्षीय हे सध्या पश्चिम बंगाल येथे भारतीय सैन्यात आपले कर्तव्य पार पाडत होते. ते पंधरा दिवसांमध्ये सेवा निवृत्त होणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना गावी पाठविले होते.
जवान लक्ष्मण पवार याच्या निधना विषयी बोलताना प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा हवाला देत जवान लक्ष्मण पवार हे शारीरिक अपघाताने मयत झाल्याचे सांगितले. तसेच प.बंगालवरुन त्यांचे पार्थिव विमानाने पुणे व नंतर मोटारीने गिरझणी गावी आणण्यात येणार आहे.
याविषयी त्यांचे बंधु विकी पवार यांनी सांगितले, 2011 साली भाऊ लक्ष्मण हे भारतीय सैन्यात दाखल झाले होते.नंतर त्यांनी लेह-लडाक,हिमाचल प्रदेश-डलहौशी,जम्मू-काश्मिर,पुणे यासह दोन वेळा प.बंगाल येथे कर्तव्य पार पाडले होते.त्यांच्या पश्चात आई-वडील;पत्नी,नऊ वर्षीय मुलगा,भाऊ,बहीण असा परीवार आहे.