पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड 2025’ पुरस्कार
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड 2025’ पुरस्कार

श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूर यास सामाजिक, पर्यावरणपूरक व प्रगत व्यवस्थापनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड 2025’ या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण पुणे येथे आयोजित भव्य समारंभात पार पडले. राज्याचे सहकार आयुक्त श्री. दीपक तावरे, चार्टर्ड अकाउंटंट श्री. मिलिंद काळे तसेच ग्रीन वर्ल्ड को-प्राईड संस्थेचे अध्यक्ष श्री. गौतम कोतवाल यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार प्रोडक्शन मॅनेजर श्री. एम. आर. कुलकर्णी, डिस्टिलरी मॅनेजर श्री. आर. एस. पाटील, संगणक विभाग प्रमुख श्री. टी. एस. भोसले, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर श्री. एस. वाय. सय्यद, तसेच श्री. मिसाळ, श्री. मोरे आदी अधिकाऱ्यांनी स्वीकारला.
पुणे येथील ग्रीन वर्ल्ड को-प्राईड संस्था दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करते. कारखान्याचे चेअरमन मा. आ. श्री. प्रशांतराव परिचारक मालक, व्हाईस चेअरमन मा. श्री. कैलास खुळे, संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी वर्गाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविलेल्या उत्कृष्ट व दूरदृष्टीपूर्ण कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ऊस उत्पादक सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत ऊसाला दिलेला स्पर्धात्मक व योग्य दर, साखर उत्पादनातील उच्च गुणवत्ता, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था, तसेच पारदर्शक व्यवस्थापन ही कारखान्याची वैशिष्ट्ये ठरली आहेत. याशिवाय इथेनॉल उत्पादन, को-जनरेशन वीज प्रकल्प, प्रेसमड व बायो-फर्टिलायझर निर्मिती, डिस्टिलरी, कचरा व्यवस्थापन व बायोगॅस प्रकल्प यशस्वीपणे राबवून कारखान्याने सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल उभे केले आहे.
ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, सहकार मूल्यांवर आधारित समाजाभिमुख व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रीन वर्ल्ड को-प्राईड 2025 पुरस्कार मिळाल्याने कारखान्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



