‘एक मूल, एक झाड’ उपक्रमाचे उद्घाटन – जि.प.प्राथमिक शाळा,चोरमले-पवार वस्ती
स्वयंस्फूर्तीने तासात, शैक्षणिक साहित्यासाठी, गावकरी आणि पालकांनी केला हजारो रुपयांचा निधी गोळा

स्वयंस्फूर्तीने तासात, शैक्षणिक साहित्यासाठी, गावकरी आणि पालकांनी केला हजारो रुपयांचा निधी गोळा
श्रीपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरमले-पवार वस्ती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, बोंडले केंद्र व उघडेवाडी महसूल अंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (z p school) चोरमले पवार वस्ती या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
शाळेचे ध्वजारोहण सुप्रसिद्ध वक्त्या, प्राध्यापिका, सूत्रसंचालिका सारिका दत्तात्रय नाईकनवरे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे सुंदर असे संचलन घेण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणे व नृत्याविष्कार सादर करण्यात आले. यामधील विशेष बाब म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीच करत होते आणि तेच विद्यार्थी भाषण व नृत्य यामध्येही सहभागी होते. प्रत्येक मुलाचा सहभाग सूत्रसंचालन, भाषण व नृत्य यामध्ये होता.
शाळेमध्ये दर शनिवारी वेगवेगळ्या स्पर्धा व उपक्रम यांचे आयोजन केले जाते. त्या स्पर्धांमध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. तीन विद्यार्थिनींची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. ग्रामपंचायत उघडेवाडी कडून चौथीतील दोन विद्यार्थ्यांसाठी ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व उपस्थित पालक वर्ग यांच्या हस्ते ‘एक मूल एक झाड’ या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
चोरमले सर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती तापोळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास, व्यायाम व संस्कार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा नाईकनवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची भाषणे, नृत्य, सूत्रसंचालन व संचलन यांची शिस्तबद्ध तयारी व सादरीकरण, उपक्रमशील दोन्ही शिक्षक, शाळेचे विविध उपक्रम यांचे खूप कौतुक केले. तसेच विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.
मुलांची भाषणे, स्क्रिप्ट, नृत्य दिग्दर्शन, कार्यक्रमाची तयारी व सजावट यामध्ये तांबोळी सर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांना सहशिक्षिका श्रीमती तापोळे मॅडम यांनी सहकार्य केले. यावेळी अनेक पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आणखी शैक्षणिक साहित्य लागत आहे हे लक्षात येताच स्थानिक पालक ग्रामस्थ यांनी तासांभरामध्ये स्वयंस्फूर्तीने हजारो रुपये वर्गणी गोळा करून शालेय साहित्यासाठी शाळेला दिली .
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊ चोरमले, चोरमले सर व सर्व ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. चोरमले सर यांच्याकडून शाळेसाठी फॅन देण्याचे घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सर यांनी मानले.