महाराष्ट्र

श्रीपूरच्या दोन्ही चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा | बस थांब्यांसमोरच बसेस थांबवण्याची मागणी

श्रीपूर–मुंबई पहाटे ५ ची बस सेवा पुन्हा सुरू करा; वाहतूक कोंडीसह दोन मागण्यांचे निवेदन

लाखोंचा बस थांबा, पण बसेस भर चौकातच; नगरसेवक प्रकाश नवगिरे यांचे अकलूज आगाराला निवेदन

[संपादक दत्ता नाईकनवरे इन महाराष्ट्र न्यूज]

श्रीपूर (ता. माळशिरस) — श्रीपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र बस थांबे उभारण्यात आले आहेत. या दोन्ही बस थांब्यांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून या बस थांब्यांच्या समोर बस गाड्या थांबवल्या जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, बसेस भर चौकामध्येच थांबत असल्याने सकाळ, दुपार व सायंकाळच्या वेळी दोन्ही चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक वेळा अपघाताचा धोका निर्माण होत आहे. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येचा सारासार विचार करून महाळुंग–श्रीपूर नगरपंचायतीचे भाजपाचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी अकलूज बस आगार डेपो येथे अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

श्रीपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस थांबा मा.खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बस थांबा मा.पदवीधर आमदार प्रकाशजी जावडेकर यांच्या निधीतून बांधण्यात आला आहे. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही या ठिकाणी बस न थांबल्याने,लाखो रुपये शासनाच्या खर्चाचा उपयोग न झाल्याचे दिसून येत आहे,   चौकातील मोठ्या वाहतुकीच्या समस्या मुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

निवेदना मध्ये श्रीपूर मार्गे येणाऱ्या सर्व बस गाड्या या दोन्ही चौकांतील बस थांब्यांच्या समोरच थांबवण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. शाळकरी मुले, पूर्व भागातील व पंचक्रोशीतील अनेक नागरिक या ठिकाणी बाजारपेठांमध्ये येत असतात. अकलूजला जाण्याचा मुख्य रस्ता या चौकामधून आहे. यामुळे दोन्ही चौकात नेहमीच वाहतुकीचा, ट्राफिकजामचा प्रश्न रोज निर्माण होत आहे.  जीव धोक्यात घालून घाबरत या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे. अनेक अवजड वाहने देखील याच ठिकाणांमधून जात आहेत. सदर निवेदनाचा सकारात्मक विचार होऊन तात्काळ अंमल बजावणी केल्यास कायमस्वरूपी  दोन्ही चौकातील वाहतुक खोळंबा कमी होऊन प्रवासी व वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत सकारात्मक विचार करून लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन अकलूज बस आगार प्रमुखांनी दिले आहे.

तसेच, श्रीपूर–मुंबई ही बस सेवा अनेक वर्षांपासून पहाटे पाच वाजता सुरू होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी बंद करण्यात आली असल्याने श्रीपूर व परिसरातील मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बस सेवा पूर्ववत पहाटे पाच वाजता तात्काळ सुरू करण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!