महाराष्ट्र

वेळापूर | झेडपी | यावेळी उमेदवारी नाही तर वेगळी भूमिका | वेळापूर मातंग समाजाचा इशारा

“वेळापूर झेडपी गटासाठी मातंग समाज एकवटला; खासदार–आमदारांकडे थेट मागणी”

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळापूर येथील सकल मातंग समाज उमेदवारीच्या मागणीसाठी एकवटला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजाने यावेळी जिल्हा परिषद वेळापूर गटातून अनुसूचित जाती महिला उमेदवारीची ठाम मागणी केली आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांना समाजाच्या शिष्टमंडळाने भेटून मागणी मांडली असून दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्यास वेगळी राजकीय भूमिका घेण्याचा इशाराही समाजाने दिला आहे.

वेळापूर (ता. माळशिरस):
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजताच वेळापूर येथील सकल मातंग समाज राजकीयदृष्ट्या आक्रमक झाला आहे. जिल्हा परिषद वेळापूर गट हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असताना, यावेळी मातंग समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी समाजाने एकजुटीने प्रयत्न सुरू केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर वेळापूर व माळशिरस तालुक्यातील सकल मातंग समाजाचे शिष्टमंडळ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील तसेच माळशिरसचे आमदार सन्माननीय उत्तमराव जानकर यांच्या भेटीसाठी उपस्थित झाले. समाजाच्या वतीने जिल्हा परिषद वेळापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून मातंग समाजाचा अनुसूचित जाती महिला उमेदवार देण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

समाज बांधवांनी सांगितले की, २०१२ मधील पंचायत समिती, २०१७ मधील जिल्हा परिषद तसेच २०२२ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागा असूनही मातंग समाजाला डावलण्यात आले. गेली २० ते २२ वर्षे मोहिते पाटील व जानकर कुटुंबाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहूनही समाजाला राजकीय संधी मिळाली नाही, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांनी समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार जानकर यांनी वरिष्ठांशी चर्चा करून संध्याकाळपर्यंत किंवा लवकरच निर्णय कळवू, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, यावेळी समाज बांधवांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर यावेळीही मातंग समाजाला उमेदवारी नाकारली गेली, तर समाज स्वतंत्र राजकीय भूमिका घेईल, तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. मात्र उमेदवारी मिळाल्यास केवळ समाजकारण नव्हे, तर सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केले जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

वेळापूर गटात केवळ मातंग समाजच नव्हे, तर इतर समाजांचाही मातंग समाजाच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे समाज प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे यावेळी होणारा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!