महाराष्ट्र

पांडुरंग कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केला, तीन हजार रुपये

कारखान्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ऊसदरासाठी आंदोलन; दोन चर्चा निष्फळ, तिसरी सफल 

पांडुरंग कारखाना परिसरात तणाव; पोलीस बंदोबस्तात ऊसदर आंदोलनावर निघाला तोडगा 

श्रीपूर (ता. माळशिरस) — कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात आज दुपारी ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र झाले. दुपारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते थेट गव्हाणीमध्ये प्रवेश करून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.

या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांशी सामोपचाराने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दरासंबंधी आवश्यक माहिती देऊन, चर्चा शांततेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करताना डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी, “कारखान्याचे ऊसदर, कामगार, व्यापारी देणी, तोडणी खर्च या सर्वांचा विचार करता तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफ.आर.पी पेक्षा कारखाना ऊसास जास्त दर देत आलेला आहे, कारखाना नेहमीच शेतकरी सभासदांचे हित जोपासत आलेला आहे. नेहमीच शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन प्रत्यक्षात आमलात देखील आणलेले आहेत. ही चर्चा होत असताना सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. परिणामी कारखाना प्रशासनाने दुपारपासून  कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

व्हा. चेअरमन कैलास खुळे आणि ज्येष्ठ संचालक दिनकर भाऊ मोरे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कारखाना अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी पुन्हा चर्चा केली. मात्र संघटना “३५०० रुपये दर जाहीर करा आणि पहिल्या हप्त्यात ३००० रुपये द्या” यावरच काही वेळ ठाम राहिले, त्यामुळे आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच राहिले.

रात्री उशिरा कारखाना प्रशासन आणि आंदोलनकरते यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली, यामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, आपल्या कारखान्याने जर तीन हजार रुपये पहिला हप्ता जाहीर केला तर, इतर कारखाने सुद्धा तात्काळ देतील, आपला कारखाना सक्षम आहे. आपण सकारात्मक विचार करून आम्हाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याचे पत्र द्यावे. अशी चर्चा होऊन कारखाना प्रशासनाने आंदोलन कर्त्याच्या मागणीला सकारात्मक घेऊन, शेतकरी सभासदांचे हित पाहून, पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याचे लेखी पत्र कारखान्याकडून शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना देण्यात आले, आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने दीपकराव भोसले, तानाजी बागल, सचिन पाटील, ऍड. दीपकराव पवार, राहुल बिडवे, अमरसिंह माने-देशमुख, गोपाळ घाडगे, माऊली जवळेकर, राजाभाऊ गायकवाड काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, बाहुबली तावळे, श्रीनिवास नागणे, शिवराम गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाला हिंसक वळण लागू नये व कायदा  सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अकलूज-श्रीपूर पोलीस स्टेशनचे पी.आय. नीरज उबाळे, एपीआय विक्रम साळुंखे आणि त्यांच्या पथकाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांच्या दक्ष उपस्थितीमुळे आंदोलन शांततेत पार पडत होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!