महाराष्ट्र

श्रीपूरचे सेवाभावी डॉ. सुधीर पोफळे यांना राष्ट्रीय ‘निमरत्न’ पुरस्कार | Dr. Sudhir Pophale

गरिबांचे आधारवड डॉ. सुधीर पोफळे; सामाजिक सेवेसाठी राष्ट्रीय ‘निमरत्न’ पुरस्कार

श्रीपूर (ता. माळशिरस) : श्रीपूर परिसरात हसतमुख, प्रसन्न आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले डॉ. सुधीर पोफळे यांना सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अकलूज शाखेतर्फे दिला जाणारा ‘निमरत्न’ हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे श्रीपूरसह माळशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीपूर येथे असलेल्या श्रीयश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या अत्याधुनिक हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. पोफळे गेली अनेक वर्षे रुग्णसेवा करत आहेत. अचूक निदान, प्रभावी उपचार पद्धती आणि रुग्णांना हसतमुखाने धीर देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांसाठी ते विश्वासाचे केंद्र बनले आहेत.

डॉ. पोफळे हे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणूनही कार्यरत असून कारखान्यातील कामगार व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अनेक आरोग्य विषयी मार्गदर्शन करणारे व मोफत सेवा देणारी शिबिरे  ते राबवीत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाबरोबरच ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही ओळखले जातात.

विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी धाडसाने आणि समर्पित भावनेने रुग्णसेवा केली. त्या काळात अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याचे समाजात मोठे कौतुक झाले होते.

सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. श्रीपूर रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, औषधोपचार शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात ते नेहमी पुढाकार घेतात. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

दरम्यान, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अकलूज शाखेतर्फे पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय, निरंतर व समाजाभिमुख कार्याबद्दल ‘निमरत्न’ पुरस्काराने डॉ. सुधीर पोफळे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार समारंभ दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता उदय सभागृह, मा. सहकारमहर्षी मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर अकलूज येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले आहे.

डॉ. पोफळे यांच्या श्रीयश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला राज्यातील अनेक नामवंत डॉक्टर भेट देत असतात, ज्यामुळे परिसरातील रुग्णांना आधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

तसेच माळशिरस तालुक्यातील आरोग्य संघटनांमध्येही ते सातत्याने कार्यरत राहून आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत.

डॉ. सुधीर पोफळे यांना मिळालेल्या या ‘निमरत्न’ राष्ट्रीय पुरस्कारामुळे श्रीपूर व माळशिरस तालुक्याचा मान उंचावला असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!