नगरसेवक प्रकाश नवगिरे सर यांच्या पुढाकाराने शिक्षक दिनानिमित्त विशेष उपक्रम
डॉ. राधाकृष्णन प्रतिमा पूजनाने श्रीपूरमध्ये शिक्षक दिन सोहळ्याची सुरुवात

श्रीपूरमध्ये शिक्षक दिनानिमित्त आजी-माजी शिक्षकांचा सन्मान आणि वृक्षारोपण
श्रीपूर प्रतिनिधी :
श्रीपूर (ता. माळशिरस) येथे शिक्षक दिन तसेच मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दुहेरी उत्साहाने कार्यक्रम पार पडला. महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेवक प्रकाश नवगिरे सर यांच्या पुढाकाराने दत्त बागेमध्ये आजी-माजी शिक्षकांचा सन्मान करून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आजी-माजी शिक्षकांमध्ये अशोक पंडित, नागनाथ वाघमारे, विष्णू भाग्यवंत, गोरख पिसे, रमेश शिंदे, महाठोका संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, ज्ञानदेव खरात, संतोष ढेरे, भीमराव साठे, दत्ता नाईकनवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षकांचा सन्मान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवर आणि शिक्षकांच्या हस्ते लोकसहभागातून तयार झालेल्या दत्त बागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक राहुल रेडे, रावसाहेब सावंत पाटील, मौला पठाण, नगरपंचायतीचे अधिकारी दत्तात्रय यादव, दिलीप माने, त्रिंबक वाळेकर, श्रीरंग वडशिंगकर, सिताराम म्हसवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले तर आभार नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी मानले. सन्मान आणि वृक्षारोपण या दुहेरी उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही अंगांनी महत्त्व प्राप्त झाले