सोलापूर जिल्ह्यात ‘पांडुरंगच’ साखर उताऱ्यात नंबर 1
पांडुरंग कारखान्याची साखर उताऱ्यात नंबर 1 ची परंपरा कायम, जिल्ह्यात ठरला अव्वल

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात जिल्ह्यात अव्वल
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नुकतेच नाम विस्तारीकरण झाले, असून आता कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या नावाने चालणार असून गत हंगाम २०२२-२३ मध्ये ही कारखान्याने जिल्ह्यात सरासरी साखर उतारा मध्ये दबदबा ठेवला असून, हंगाम अखेर ११.५०% सरासरी साखर उतारा मिळवून जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्या चा सरासरी साखर उतारा पाहता तो कमी असल्याचे दिसून येत आहे.कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात ९ लाख ६१ हजार मे.टन उसाचे गाळप करून जिल्ह्यात सर्वाधिक ११.५० टक्के साखर मिळवत ९ लाख ५५ हजार ५९० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन काढले आहे. त्यामुळे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कारखाना दरात ही जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहणार आहे .तसेच माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने जिल्ह्यात सर्वाधिक १८ लाख ४१ हजार मे.टन गाळप केले आहे. गतवर्षी पाऊसमान कमी झाल्याने १० ते १५ मे टन उसाचे उत्पादन प्रति एकरी कमी निघाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्याचे गाळप अपेक्षापेक्षा कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या हंगामात सर्वच कारखान्यां चा गाळप हंगाम एक महिना अगोदरच आटोपला आहे.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मागील दहा वर्षापासून ऊस दरात व साखर उताऱ्यामध्ये जिल्ह्यात दबदबा कायम ठेवला असून व उत्पादक शेतकऱ्यांनाही साखर उताऱ्याप्रमाणे सर्व ऊस बिलाची रक्कम वेळेवर दिली आहे. पुढील गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये हा कारखाना प्रतिदिन ९ हजार मे.टन गाळप क्षमतेने चालणार असून त्या दृष्टीने कारखान्यामधील आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात येत आहेत. या हंगामात कारखान्याने १४१ दिवस कारखाना चालवून ९ लाख ६१ हजार मे.टन उसाचे गाळप करून ९ लाख ५५ हजार क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. दिवसेंदिवस कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र आहे तेच असून प्रत्येक कारखान्याने स्वतःची गाळपक्षमता वाढवल्यामुळे प्रत्येक वर्षाचा गाळप हंगाम हा सुमारे १५ ते २० दिवस अगोदरच संपत आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ऊस गाळपाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ते बदल करण्यास सुरुवात केली आहे.