शिवजन्मोत्सव प्रतिष्ठान,नातेपुते कडून शिव व्याख्यानमालेचे आयोजन
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारतमाता विश्वगुरूच्या मालिकेत आहे.पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते.
नातेपुते (संजय लोहकरे) विविध मत प्रवाहातून आज आपला देश उभा आहे. काश्मीरमधील ३७० वे कलम मोदींनी रद्द केले आहे.त्यांच्याकडे जी-२०चे अध्यक्ष पद चालून आले आहे.शिक्षण पद्धतीत परिवर्तन होऊ लागले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार या महापुरुषांच्या विचाराने देशाची प्रगती गतिमान ठेवली पाहिजे.त्यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारत माता विश्वगुरूच्या मालिकेत आहे असे प्रतिपादन पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते यांनी व्यक्त केले.ते काल नातेपुते येथील शिवजन्मोत्सव प्रतिष्ठान तर्फे शिव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.त्याप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी भिकुजी उर्फ दादा इदाते यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.रामहरी रुपनवर हे उपस्थित होते.
या व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात बाबाराजे देशमुख म्हणाले, दादाजी इदाते यांनी भटक्या, विमुक्त,वंचितांसाठी संपूर्ण देशात मोठे काम उभा केले.ज्यांचा आवाज निघत नाही अशाचा ते आवाज बनले.त्यांना वीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या ते नीती आयोगाचे सदस्य आहेत.बहुजन समाजाला व वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक समरसता मंचातर्फे त्यांनी केले आहे.त्याचा गौरव करण्याचा मान नातेपुतेकरांना मिळाला ही भाग्याची गोष्ट आहे.
प्रमुख पाहुणे भिकुजी उर्फ दादाजी इदाते म्हणाले,वयाच्या दहाव्या वर्षात मी शाखेत आलो आहे.वंचित घटकातील मी असून संघ विचारामुळे व संघ संस्कारामुळे मी आणि माझा समाज आणि संपूर्ण भटका समाज यामध्ये परिवर्तन करू शकलो आहे.देशात जो या भूमीला पितृभूमी,पुण्यभूमी मानतो तो हिंदू ! काहीजण समाजवादी व कम्युनिस्ट लोक धर्म म्हणजे आफुची गोळी समजतात.संस्कृती नष्ट करण्याचे काम करतात.संस्कृतीचं नातं तोडलं पाहिजे असे म्हणतात ही एक फॅशन झाली आहे.परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये हिंदूंची व्याख्या केली आहे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल करताना मुस्लिम,ख्रिश्चन,यहुदी, पारशी हे सोडून इतर सर्वजण हिंदू असे सांगितलेले आहे. आपल्या देशाच्या इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. महात्मा गांधी म्हणत तुम्ही हरिजन.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत मग तुम्ही कोण ?असे वैचारिक मतभेद असतानाही आपला भारत हा सक्षमपणे उभा आहे. १९२० मध्ये डॉ. आंबेडकरांनी मूकनायक वृत्तपत्र काढले. देशाचा तो नायक आहे परंतु तो बोलू शकत नाही तो मुका आहे.बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले व त्यानंतर समता हे वर्तमानपत्र काढले या तिन्हीही वर्तमानपत्राच्या मुखपत्रावर संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज व महाभारतातील वचने दिलेली होती.राष्ट्रवादाचा विचार प्रभावीपणे मांडला.या विरुद्ध मानवेंद्र रॉय यांनी हिंदू आणि हिंदुत्व हे टाकाऊ आहेत असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सुनील राऊत यांनी केले तर सुत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा सन्मान सुनील राऊत,किशोर पलंगे,गणेश पागे,सुधीर काळे,मंगेश दीक्षित, शशिकांत कल्याणी,राहुल पद्मन यांनी केले.