कृष्णा खोरे फ्लड डायवर्षण प्रोजेक्टला तत्वता मान्यता
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक गावांना होणार फायदा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती
सोलापूर प्रतिनिधी – पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली व सातार्यातील काही भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतुन जे पाणी वाहून कर्नाटकात जाते. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते तसेच कोटीवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असते. यासाठी हे वाहुन जाणारे पाणी सोलूपर जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील अनेक दुष्काळी भागांना मिळावे यासाठी फ्लड डायवर्षण प्रकल्प राबवावा अशी मागणी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्याला तत्वता मान्यता देण्यात आली आहे.
पावसाळ्यात हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर माढा सोलापूर या दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण खटाव फलटण पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल यासंदर्भामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीची बैठक घेऊन बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला तत्वता मान्यता दिली आहे.मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आ. शहाजी पाटील, आ. बबनदादा शिंदे, चेतन केदार आदी उपस्थित होते. तसेच जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर व जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक कपोले अधिक्षक अभियता कुमार पाटील, चिफ इंजिनिअर गुनाले, कार्यकारी अभियंता योगेश सावंत ही या बैठकीला उपस्थित होते.
हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणार्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद तातडीने करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. यामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठी भेट फडणवीस यांनी दिली आहे. भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा चा प्रश्न यामुळे मिटणार आहे. हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होईल असा विश्वास ही माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.