श्रीपूरचे शाळा, कॉलेज रोड रोमियोंच्या विळख्यात | विद्यार्थिनी व पालक चिंतेत
निर्भया पथक नावालाच?, पोलीस लक्ष देणार का? पालक, स्थानीक नागरिकांचा सवाल?

निर्भया पथक नावालाच?, पोलीस लक्ष देणार का? पालक, स्थानीक नागरिकांचा सवाल?
श्रीपूर तालुका माळशिरस येथील चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे क.महाविद्यालयामध्ये अनेक मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. परंतु अवती भवतीच्या, गावांमधील व स्थानिक आंबट रोड रोमिओच्या त्रासामुळे मुलींना येता-जाता रस्त्यामध्ये, शाळा परिसरामध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे रोड रोमिओ शाळेच्या अवतीभवती ठिया मांडून असतात. यामुळे शालेय विद्यार्थिनी व पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे शहरांमधील आणि मणिपूर राज्यांमधील महिलां आणि मुलींवर अत्याचार होणाऱ्या घटना ताज्या असतानाच श्रीपूर सारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये कायद्याचा धाक न राहिल्यामुळे, पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे, शाळा परिसरात आणि रस्त्यामध्ये, चौकामध्ये रोड रोमियोंचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलींच्या भोवती परिसरामध्ये पाहावयास मिळत आहे. हॉर्न वाजवणे, मागे पुढे ये जा करणे, मुलींचा पीछा करणे, पाचकळ बोलणे असे प्रकार घडत आहेत. शाळा कॉलेज भरण्याच्या वेळेला, मधल्या सुट्टीमध्ये आणि शाळा सुटल्यावर, आपल्या दुचाकी वरती, दोन-तीन रोड रोमिओ एका गाडीवरती बसून, डोक्यावरती केसाची विचित्र स्टाईल, हातामध्ये गाडी चालवत मोबाईलवर बोलणे, आपली आंबट हिरोगिरी मिळेल त्या ठिकाणी दाखविताना दिसत आहेत. मुलींचा शाळे कडील जाण्या येण्याच्या रस्त्यावरती ग्रुपने उभे राहणे. या सर्व त्रासांमुळे मुलींच्या शिक्षणाचा व संरक्षणाचा प्रश्न पालकांच्या समोर उभा आहे.
शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत, परंतु निर्भया पथक या ठिकाणी येऊन आपली कारवाई करत नाही व शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून जनजागृती व अशा दुर्घटना घडल्यास आपला बचाव कसा करावा यासाठीचे महिला पोलीस अधिकाऱ्याकडून प्रशिक्षण, जनजागृती करणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्याच्या पोलीस विभागाला उपविभागीय पोलीस अधिकारी एक सक्षम महिला अधिकारी आलेल्या आहेत. निश्चितच या घटनेचे गांभीर्य ओळखून, सर्व परिसरामधील शाळा, कॉलेज ज्या ठिकाणी महिला, मुलींना अशा प्रकारचा त्रास दिला जात आहे. त्यांच्यावरती कडक कारवाई करतील अशी विद्यार्थिनी, स्थानिक नागरिक व पालकांमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.