यमाईदेवी मंदिर महाळुंग मध्ये घटस्थापना | शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ
श्री यमाईदेवी मंदिराभोवती, आकर्षक विद्युत रोषणाई, परिसर उजळला

श्री यमाईदेवी मंदिराभोवती, आकर्षक विद्युत रोषणाई, परिसर उजळला
महाळुंग-श्रीपूर मधील व सर्व भाविक भक्तांची कुलस्वामीनी यमाई देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून महाळुंग येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी यमाईदेवीस पहाटे पारंपारिक पध्दतीने हत्ती या वाहनावरती विराजमान करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
महाळुंग येथील जागृत देवस्थान श्री यमाई देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. रविवारी सकाळी साडेआठ वाजता मानकरांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना करून आई राजा उदो-उदोच्या जयघोषात पारंपारिक ढोल पिपाणी तुतारी वाद्याच्या गजरात सर्व पुजाविधी करण्यात आले.
मंदिर शिखरावरती व मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात आली आहे. परिसरातील घरोघरी देखील पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे. आसपासच्या गावातील अनेक देवीचे भक्त ज्योत या ठिकाणीच प्रज्वलित करून आपल्या देवीच्या प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी घेऊन जात असतात. भाविक भक्तांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचे दिवसभरात दिसून आले.
परिसरातील व बाहेरील सर्व भाविक भक्त पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी करत असतात. अनेक भाविक भक्तांनी आपल्या इच्छेप्रमाणे उपवास देखील धरले आहेत. गावातील व आसपासचे देवीचे भक्त नऊ दिवस उपवास धरून देवीची आराधना करत असतात. काही भाविक भक्त याच ठिकाणी नऊ दिवस किंवा पाच दिवस मुक्कामी असतात. देवीचे दोन वेळा दर्शन घेऊन फराळ करून याच ठिकाणी मुक्कामी असतात असा काही भाविक भक्तांचा या ठिकाणी नित्यक्रम सुरू असतो. नवरात्र उत्सवानिमित्त देवीचा छबिना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी होत असते.