माळी समाजाचा नाशिकमध्ये भव्य मेळावा; संस्थेने गाठला १ कोटी ३० लाखांचा ऐतिहासिक टप्पा
शिष्यवृत्ती, डिजिटलायझेशन आणि एकोपा | माळी समाज प्रबोधन संस्थेचा मेळावा उत्साहात संपन्न

उदार देणग्यांचा वर्षाव, गुणवंतांचा गौरव आणि समाजएकतेचा संगम नाशिकमध्ये
माळीनगर (प्रतिनिधी) –
अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेची विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी तसेच समाजबांधवांचा भव्य मेळावा रविवारी (दि. 23 नोव्हेंबर) नाशिक येथे अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे तसेच संत सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक प्रबोधनासाठी संस्थेची वाटचाल दृढ
अ.भा. माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, त्यांचा सर्वांगीण विकास साधणे या उद्दिष्टांसाठी सातत्याने कार्य करत आहे. या मेळाव्यात प्रथम विश्वस्त मंडळाची, त्यानंतर मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून संस्थेवरील अभिमान आणि विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे सरचिटणीस प्रशांत एकतपुरे यांनी स्थापनेपासूनची कामगिरी व उपक्रमांचा आढावा सादर करताना, अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी समाजातील दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक उद्योजक आणि समाजबांधवांनी देणगीची घोषणा केली.
- मुंबई – दशरथ माळी (₹१ लाख)
- अमरावती – राजू सुंदरकर (₹५१ हजार)
- नाशिक – सुनील फरांदे (₹२१ हजार)
- कल्याण – हिरामण बच्छाव (₹११ हजार)
- अतुल गिरमे, अमोल शिंदे (प्रत्येकी ₹१० हजार)
- दीपक गिरमे, कल्पेश पांढरे, रितेश पांढरे (प्रत्येकी ₹५ हजार)
या सर्वांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डिजिटल समाजसक्षमीकरणाचा अभिनव प्रस्ताव
नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी संपूर्ण माळी समाजाची माहिती एकत्रित करणारे विशेष डिजिटल सॉफ्टवेअर तयार करण्याचा अभिनव प्रस्ताव मांडला. या प्रस्तावामुळे संस्थेचे डेटा व्यवस्थापन, शैक्षणिक मार्गदर्शन आणि समाजसंपर्क अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
सोनवणे कुटुंबाचा आदर्श उपक्रम
या सभेसाठी हॉटेल ट्रीट (फोर स्टार), नाशिक येथे समाजबांधवांसाठी निवास, भोजन, सभागृह या सर्व सुविधा विश्वस्त नीलिमाताई सोनवणे आणि त्यांचे चिरंजीव आनंद सोनवणे यांनी स्वतःच्या खर्चावर उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या उदार योगदानाचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
संस्थेची आर्थिक प्रगती—ऐतिहासिक टप्पा गाठला
संस्थेने तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला. पारदर्शक व्यवस्थापन, अचूक नियोजन आणि सर्व विश्वस्तांचे परिश्रम यामुळे संस्थेची आर्थिक घडी अधिक भक्कम झाल्याचे समाजबांधवांनी गौरवले.
मेळाव्यात समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी इयत्ता 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला मुख्य विश्वस्त पद्मकांत कुदळे, प्रकाश लोंढे, जयवंतराव गायकवाड, मोतीलाल महाजन, विश्वनाथ भालिंगे, रवी चौधरी, नीलिमा सोनवणे, तज्ञ विश्वस्त दत्तात्रय बाळसराफ, बाजीराव तिडके, खजिनदार विजय लोणकर, उपाध्यक्ष हिरामण बच्छाव, ऍड. गोविंद बादाडे, पुंडलिक लव्हे, भाऊसाहेब मंडलिक, सुनील फरांदे, स्नेहलताई बाळसराफ, अतुल गिरमे, दीपक गिरमे, मनोज झगडे, कल्पेश पांढरे, रितेश पांढरे, अमोल शिंदे, क्लार्क नंदकुमार लडकत, अकाउंटंट जयप्रकाश बगाडे व शुभम साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिक येथील हा मेळावा समाजातील एकात्मता, प्रबोधन आणि विकासाचा सुंदर संगम ठरला. संस्थेच्या पुढील वाटचालीला नवी दिशा देणारा हा सुवर्ण क्षण असल्याची भावना समाजातून व्यक्त झाली.



