महाराष्ट्र

महाळुंग-श्रीपूर व बोरगाव–माळेवाडी, नॅशनल हायवेवर अपघातांचा कहर | खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची गडकरींकडे तातडीची मागणी

वाढते अपघात थांबवण्यासाठी खासदारांचा पुढाकार; NH965G परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

माळशिरस तालुक्यातील नॅशनल हायवेवर प्रमुख रस्त्यांवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना हस्तक्षेपाचा आग्रह

अकलूज (प्रतिनिधी) –
माढा लोकसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील  संत तुकाराम महाराज पालखी  महामार्गावरती सातत्याने होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांना सविस्तर पत्र लिहून तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात खासदार मोहिते पाटील यांनी नमूद केले आहे की, माळशिरस तालुक्यातील संत तुकाराम महाराज पालखी  महामार्ग NH965G- अंतर्गत महाळुंग-श्रीपूर मार्ग, महाळुंग-श्रीपूर-अकलूज तसेच बोरगाव–माळेवाडी(बो), बोरगाव-खंडाळी (एमडीआर-१७९) रस्ता, महामार्ग ओलांडून लहान मोठे वाडी वस्ती वरती जाणारे उपरस्ते, परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या रस्त्यांचा वापर शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण, कामगार व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मात्र या मार्गांवर आवश्यक सुरक्षा सुविधा नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेषतः महाळुंग-श्रीपूर मार्गावरील कि.मी. 116/500 ते 117/500 दरम्यानचा रस्त्याचा भाग अत्यंत अपघातप्रवण असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्ता अरुंद असून, आजूबाजूला लहान-मोठ्या वस्त्या आहेत. वाढलेली वाहनसंख्या, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपुरी रस्ते सुरक्षा यामुळे वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक जखमी होत आहेत. अनेकांचे मृत्यू झालेले आहेत. 

तसेच बोरगाव–माळेवाडी(बो) (एमडीआर-१७९) मार्गावरही अपघातांची संख्या वाढली असून काही गंभीर अपघातही घडले आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव पत्रातून मांडण्यात आले आहे.

याशिवाय, बोरगाव सीमेलगत मदनसिंह पाटील यांच्या निवासस्थानाजवळ (कि.मी. 123/400) उड्डाणपूल अथवा आवश्यक वाहतूक व्यवस्थेची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून, त्या मागणीवरही सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता, अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल, गतिरोधक, रस्त्यांचे रुंदीकरण, सूचना फलक, वेग मर्यादा चिन्हे, योग्य प्रकाश व्यवस्था व संरक्षक भिंती यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकरणात संवेदनशील व सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित कारवाई करावी, असे स्पष्टपणे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!