महाराष्ट्र

जुन्या आठवणींचा उत्सव | श्रीपूर उजनी वसाहत स्नेहमेळावा संपन्न :

जुन्या आठवणीने अनेकांना आनंदअश्रू अनावर

दत्ता नाईकनवरे (संपादक)

श्रीपूर उजनी वसाहत स्नेहमेळावा | तीस वर्षा पूर्वी वसाहती मध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटीगाठी

श्रीपूर तालुका माळशिरस येथील उजनी कॉलनी वसाहतीमध्ये गेले 30 ते 40 वर्षांपूर्वी या ठिकाणाहून बदली झालेले, सेवानिवृत्त झालेले, अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्व कुटुंबियांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन श्रीपूर  उजनी  वसाहती मधील हॉलमध्ये करण्यात आले होते. जवळपास 30 वर्षांपूर्वीचे सर्व मित्र-मैत्रिणी, शेजारी, पाहुणे, नातलग आणि या सर्वांच्या कुटुंबातील सदस्य  यांनी एकत्रित येऊन स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला.

सकाळी दहा वाजण्याचे सुमारास पाऊस सुरू असताना देखील काही कुटुंब अकराशे किलोमीटरच्या वरून या मेळाव्यासाठी हजर झाले होते. जवळपास 100 चे वर कुटुंब व त्यामधील सदस्य असे एकूण 250 जण या मेळाव्यामध्ये उपस्थित होते. आजी, आजोबा, त्यांची मुलं, सुना, नातवंडे, त्यावेळचे रावसाहेब, भाऊसाहेब, भाऊ, दादा, काका, मामा, अशी नाती असलेले एकत्रित कुटुंबे या मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी आणि जुन्या आठवणी परत ताज्या करण्यासाठी या उजनी वसाहतीमध्ये एकत्रित आले होते. 

येताना आयोजकांनी प्रत्येक कुटुंबाला एक वृक्षरोप आणण्यास सांगितले होते त्याप्रमाणे अनेक कुटुंबांनी रोपे आणून आठवण म्हणून उजनी परिसरामध्ये वृक्षरोपण देखील केले. 

सुरुवातीला आल्यावर एकमेकांच्या भेटीगाठी घेताना काहींना पटकन नाव आठवत नव्हतं पण चेहरा आठवत होता, अशी काहींची अवस्था झाली होती आणि ओळख सांगितल्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन आनंद व्यक्त केला जात होता.  याच उजनी वसाहतीमध्ये हे सर्वजण एकत्रित पूर्वी राहत होते. गणेश उत्सव. दत्त जयंती. हनुमान जयंती. महाळुंग यमाई देवीची अष्टमी आणि नवरात्र उत्सव या सर्व मंडळींनी त्यावेळेला अनुभवला होता.  या सर्व गप्पाटप्पा या भेटीमध्ये सांगून सर्व आठवणी ताज्या करत होते.

उपस्थित सर्वांचे फेटे बांधून हलगीच्या तालावरती स्वागत करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अनेकांनी मनोगत व्यक्त करताना साधारण 108 चे वर असणाऱ्या इथल्या खोल्या.  त्यावेळचे सणवार, उत्सव, शाळेचे स्नेहसंमेलन, स्थानिक उत्सव साजरे करतानाच्या आठवणी सांगितल्या.  1978 च्या सालामध्ये या उजनी वसाहतीची निर्मिती झाली होती.  त्यावेळेला एक उच्च दर्जाची वसाहत म्हणून या उजनी वसाहतीला पाहिले जात होतं. उंच टेकडीवरती  माळराणा वरती ही वसाहत त्यावेळेला  उजनी कालवा इरिगेशन विभागाकडून स्थापन करण्यात  आली  होती.  आणि त्या निमित्ताने इथे अनेक अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंब पाहुणे मित्रमंडळी या  वसाहतीमध्ये एकत्रित राहू लागले होते. 

त्यामुळे नियमित शेजाऱ्याच्या घरी खाऊ, भाजी भाकरी ची देवाणघेवाण नियमित होत होती. याच्या आठवणी देखील करून दिल्या.  आपल्या मुलांना शाळेमध्ये जाताना कोणत्या प्रकारचा डबा दिला जात असे हे देखील आपल्या मनोगता मधून काहीही सांगितले. 

आता या उजनी वसाहतीची अवस्था बंद पडलेल्या वाड्यासारखी झालेली आहे.  तरीपण अनेक कुटुंबाने आपण पूर्वी कोणत्या खोल्यांमध्ये राहत होतो त्या ठिकाणी जाऊन फोटोसेशन करून आपल्या आठवणी ताज्या करत होती. आपल्या मुलांना नातवंडांना त्यावेळच्या आठवणी, गमतीजमती, परिस्थिती, राहणीमान सांगत होते.

दुपारी उजनी कॉलनी मधील पाण्याच्या टाकी शेजारी हॉटेलमध्ये सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी गप्पाठप्पा मारत दुपारच्या जेवणाचा पूर्वीसारखा  एकत्रित आनंद घेतला. 

दुपारच्या सत्रामध्ये राहिलेल्यांच्या गप्पागोष्टी ओळख परेड करून प्रत्येक कुटुंबाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आयोजकांकडून आणि स्थानिकांकडून भेट देण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी विक्रमसिंह लाटे, नगरसेविका तेजश्री लाटे, विजय लाटे, अलका रेडे-आदमीले, उज्वला रेडे-लाटे, विपिन वगरे, धीरज गाडे, आनंद वेताळ, सचिन खंडागळे, बापू चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करून दाखविला याबद्दल सर्व कुटुंबीयांनी  आयोजकांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!